Vedanta-Foxconn project साठी तळेगावमधल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत, Exclusive Report
प्रकल्प परत आणण्याच्या मागणीसाठी आंदोलन उभारण्याचा स्थानिकांचा इशारा, तळेगावमधून झी २४ तासचा ग्रॉउंड रिपोर्ट
अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : Vedanta-Foxconn project महाराष्ट्रबाहेर गेल्याबद्दल मावळातील (Maval) शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. पुण्याजवळच्या तळेगाव दाभाडे एमआयडीसीमध्ये (Talegoan-Dabhade MIDC) हा प्रकल्प उभा राहणार होता. मात्र आता तो गुजरात मध्ये जाणार असल्याची बातमी कळताच तळेगाव परिसरात अस्वस्थता पसरली आहे. हा प्रकल्प परत आणण्याच्या मागणीसाठी आंदोलन उभारण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय.
मुंबई - पुणे महामार्गावरील (Mumbai-Pune Highway) तळेगाव एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक चार मधील जमीन फॉक्सकॉन - वेदांताला देऊ करण्यात आली होती. मावळमधील आंबळे, निगडे, कल्हाट आणि पवळेवाडी शिवारातील सुमारे 6000 एकर जमीन टप्पा चार साठी संपादित करण्यात येत आहे. ही संपादन प्रक्रिया मागील चार वर्षांपासून सुरू असून शेतकऱ्यांच्या सातबारावर एमआयडीसीचा शिक्का देखील पडलेला आहे. इतकंच नाही तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात मोबदला देखील देण्यात आला आहे. संपादित करण्यात येत असलेल्या एकूण जमिनीपैकी सुमारे 1000 एकर जमीन फॉक्सकॉन - वेदांताला देण्याचं राज्य सरकारने कबूल केलं होतं. त्याशिवाय गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन म्हणून अनेक प्रकारच्या सवलती तसेच सुविधा राज्य सरकारने देऊ केल्या होत्या. एका अर्थाने या कंपनीसाठी राज्य सरकारने रेड कार्पेट अंथरलं होतं. त्याचा परिणाम म्हणून कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.
फॉक्सकॉन - वेदांता या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यामध्ये एक लाख 54 हजार कोटींची गुंतवणूक येणार होती. प्रकल्प उभा राहिल्यानंतर सुमारे दोन लाख लोकांना रोजगार मिळणार होता. त्यामुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक भरभराटीसह स्थानिकांच्या जीवनात बदल आणणारा ठरणार होता. या सगळ्या गोष्टींचा विचार करून कंपनीसोबतचा व्यवहार अंतिम टप्प्यात होता. मात्र घडलं वेगळच. हा प्रकल्प महाराष्ट्र ऐवजी गुजरातमध्ये होणार असल्याची बातमी अचानकपणे झळकली आणि एकच गदारोळ उडाला.
सुरुवातीला इथल्या शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी जमिनी देण्यास विरोध केला होता. मात्र त्याचे महत्त्व पटल्यानंतर त्यांनी स्वतःहून जमिनी देऊन केल्या. आंबळे गावातील रोहिदास महाराज धनवे यांची जमीन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली आहे. आपल्या जमिनीवर मोठा प्रकल्प उभा राहणार असल्याचा त्यांना आनंद होता. मात्र आता अपेक्षाभंग झाल्याचं ते सांगतात. त्यांच्यासारखेच शेकडो शेतकरी आणि ग्रामस्थ आहेत. प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांच्या हाताला काम मिळेल, व्यावसायिकांना छोटी-मोठी कंत्राट मिळतील तसंच या भागाचा विकास होईल असं त्यांना वाटायचं. आता मात्र त्यांनी पाहिलेला उज्वल भविष्याच स्वप्न हे स्वप्नच ठरते की काय अशी भीती त्यांच्या मनात आहे.
फॉक्सकॉन - वेदांता सेमी कण्डक्टर आणि डिस्प्ले निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहेत. तो महाराष्ट्रात उभा राहिल्यास तळेगाव एमआयडीसी सेमी कंडक्टर हब म्हणून नावारूपाला येणार आहे. हा प्रकल्प आपल्या राज्यात यावा यासाठी कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्र यांच्यात चुरस होती. दरम्यानच्या काळात कर्नाटकचं नाव मागे पडलं. त्यामुळे महाराष्ट्र किंवा तेलंगणा या दोन पैकी एका राज्यात ही गुंतवणूक अपेक्षित होती. त्यातही महाराष्ट्र आघाडीवर होता. केंद्राच्या होकारानंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार होतं. असं असताना स्पर्धेत नसलेल्या गुजरातमध्ये हा प्रकल्प जाणार आहे. याचा नेमका काय अर्थ काढायचा असा प्रश्न मावळ्यातील लोकांना पडला आहे.