)
राज्याचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून यादरम्यान अनेकदा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून सुरु असलेल्या धडक कारवाईचा उल्लेख विरोधकांकडून करत कौतुक करण्यात आलं आहे. यावेळी अनेकांनी त्यांची बदली करु नका असा चिमटाही या खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांना लगावला आहे. दरम्यान मंगळवारी उद्वव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी तुकाराम मुंढेंकडून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. दूध विक्रेत्यांना थोडा वेळ द्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
राज्यात अनेक ठिकाणी तबेले असून, म्हशीचं संवर्धन करुन दूध शहराकडे आणलं जातं. पालघर, वसई, आरे कॉलनी या ठिकाणी तबेल्यातून दूध आणून शहरात विकतो. अनेक लोक वर्षानुवर्षं हा व्यवसाय करत आहेत. राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयावर मला सरकारचं लक्ष वेधून घ्यायचं आहे.
तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या वतीने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणली आहे. आजपासून बंदी आणली तर आज आलेलं दूध तबेल्यात उत्पादित करणाऱ्यांनी आणि ते बाहेर विक्री करणाऱ्यांनी कसं विकावं? त्यामुळे काही वेळ दिली जावी. दुसरी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत हे दूध विकण्याची परवानगी द्या. अन्यथा काय होईल आजच्या आज तुकाराम मुंढेंचं पथक तबेल्यातून विकल्या जाणाऱ्या दुधावर कारवाई करेल. हजारो कोटी रुपयांचं नुकसान होईल. सरकारने यात लक्ष घालावं. पर्यायी व्यवस्था करेपर्यंत मुदत द्यावी, त्यानंतर कारवाई सुरु ठेवावी.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर उत्तर देताना म्हटलं की, "सुनील प्रभू यांची सूचना गंभीर आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करेल. आताच्या आता बंद करुन राज्यात हाहाकार माजवण्यापेक्षा काही मुदत देता येईल का यासंदर्भात चर्चा करेन आणि त्यानंतर सभागृहात निवेदन मांडेन".
धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात अन्न व औषध प्रशासनाने भेसळीविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. विनापरवाना साठवून ठेवलेली 1125 किलो दूध पावडर जप्त केली आहे. या कारवाईत 61 बॅगमधील सुमारे 2 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
ही दूध पावडर बाळासाहेब घोडके यानी विनापरवाना साठवून ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले असून याप्रकरणी भूम पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. भूम तालुका खवा, पेढा आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असून, भेसळीच्या तक्रारींवरून अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई केली.
या कारवाईमुळे परिसरातील भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.