सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन, दुकाने २ वाजेपर्यंत सुरु राहणार

कोरोनाचा फैलाव वाढताना दिसत आहे. राज्यातही कोरोना विषाणूचे संक्रमण होत असल्याने जास्तच खबरदारी घेण्यात येत आहे.  

Updated: Jul 10, 2020, 10:31 AM IST
 सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन, दुकाने २ वाजेपर्यंत सुरु राहणार title=
प्रतिकात्मक छाया

मुंबई : कोरोनाचा फैलाव वाढताना दिसत आहे. राज्यातही कोरोना विषाणूचे संक्रमण होत असल्याने जास्तच खबरदारी घेण्यात येत आहे. राज्य शासनाने स्थानिक पातळीवर लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार आता सातारा जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.  कोरोनाचा धोका लक्षात घेऊन आणि कोविडचे संक्रमण रोखण्यासाठी आता सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने उघडी राहणार आहेत. 

सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. सर्व बाजारपेठा, दुकाने दि १० ते ३१ जुलै या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी २ या काळात सुरु ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरुवारी रात्री दिले आहेत. त्यामुळे आता घराबाहेर पडताना प्रत्येकाला काळजी घ्यावी लागणार आहे. तोंडावर मास्क अनिवार्य असणार आहे. दरम्यान, याआधी बाजारपेठा, दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरु ठेवण्यात येत होती. मात्र, कोरोनाचा धोका लक्षात घेता दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 

राज्यात ६८७५ नवीन रुग्णांचे निदान झाले. तसेच काल २१९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१९% एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ९३,६५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात एकूण २,३०,५९९ एवढी रुग्ण संख्या आहे. त्यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. आता  सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असणार आहे.