)
Maharashtra government Job : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यादांच एकाचवेळी 10 हजारांपेक्षा जास्त लोकांना सरकारी नोकरीचे डायरेक्ट अपॉईंटमेंट लेटर देण्यात आले. अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील निवड झालेल्या 10 हजार पेक्षा अधिक उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. अनुकंपाच्या संदर्भात अनेक नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यामुळे सर्व निर्णयांचे पुनरावलोकन करून एक सोपा आणि सर्वसमावेशक शासन निर्णय करण्यात आला. अनुकंपा तत्वावर नोकरी देणे हे काही उपकार नाहीत, तर ती शासनाची जबाबदारी आहे. आतापर्यंत 80% अनुकंपा नियुक्त्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित नियुक्त्या लवकरच पूर्ण केल्या जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
26/11/2008 रोजी मुंबईत झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मोरे यांची कन्या अनुष्का मोरे यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात आली ही समाधानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. रिक्त पदे भरण्यासाठी टीसीएस-आईबीपीएसमार्फत पारदर्शकपणे परीक्षा घेऊन जवळपास 1 लाख लोकांना नियुक्त्या देण्यात आल्या. यामध्ये 40 हजार पोलिसांची भरतीही समाविष्ट आहे. सेवा प्रवेश नियम सुधारून नियुक्ती प्रक्रियेला वेग देणार असून, 2026 ला मोठ्या प्रमाणात नोकर भरती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
शासकीय सेवेत आल्यानंतर तुम्ही लोकाभिमुखतेने आणि पारदर्शी पद्धतीने कारभार कराल. शासन आणि प्रशासन हे जनतेला सेवा देण्यासाठी निर्माण झाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार जनता मालक आहे, आणि आपण सर्वजण त्यांची सेवा करण्यासाठी नियुक्त केलेली व्यवस्था आहोत. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी सेवेकरी म्हणून संवाद साधा. आपल्या कामातून तुमच्याकडे येणाऱ्या किमान 10% लोकांच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य फुलवू शकलात, तर त्यापेक्षा मोठे समाधान जीवनात दुसरे काही नसते. आपण सेवा करण्याकरता येथे आलेलो आहोत. हा सेवाभाव तुम्ही कायम ठेवल्यास, सरकारी सेवेत काम करताना मिळणारे मानसिक समाधान कोणत्याही पैशाशी तुलना न करता येणारे समाधान असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री जयकुमार रावल, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादाजी भुसे, आमदार डॉ. परिणय फुके व इतर मान्यवर उपस्थित होते.