पुढच्या दीड वर्षात अजित पवार मुख्यमंत्री होतील, मोठ्या नेत्याने वर्तवलं भाकीत; म्हणाले 'देवेंद्र फडणवीस...'

येत्या वर्ष-दीड वर्षात देवेंद्र फडणीस दिल्लीला जातील आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हाल असं भाकीत राज्यातील एका मोठ्या नेत्याने वर्तवलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 11, 2025, 09:40 PM IST
पुढच्या दीड वर्षात अजित पवार मुख्यमंत्री होतील, मोठ्या नेत्याने वर्तवलं भाकीत; म्हणाले 'देवेंद्र फडणवीस...'

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही तशी लपून राहिलेली नाही. अनेकदा त्यांनी याबद्दल जाहीरपणे भाष्य केलं आहे. मलाही अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री व्हावं असं वाटकत आहे, पण तसा योग येत नाही असं विधानही त्यांनी केलं होतं. त्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित पवारांना नेहमीच मुख्यमंत्री व्हा अशी साद घालत तशी बॅनरबाजीही करत असतात. दरम्यान नुकतंच  माजी खासदार भास्करराव पाटील खातगावकर यांनी अजित पवार मुख्यमंत्री होतील असं भाकीत केलं आहे. नांदेडमधील कार्यक्रमात ते बोलत होते. 

नांदेडमधील कार्यक्रमात भाषण करताना भास्करराव खतगावरकर यांनी वर्तवलेल्या भाकिताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबतत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला. अजित पवार मुख्यमंत्री होतील असं भाकीत वर्तवताना त्यांनी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील असाही दावा केला. 

भास्करराव पाटील खतगावकर नेमकं काय म्हणाले?

“दादा माझं भाकीत खरं होतं. मी अशोक चव्हाण यांना म्हटलं होतं तुम्ही मुख्यमंत्री व्हाल ते मुख्यमंत्री झाले. दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये राजकीय चर्चा होते. तिथे अशी चर्चा आहे की येत्या वर्ष-दीड वर्षात देवेंद्र फडणीस दिल्लीला जातील आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हाल,” असं भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले आहेत. यादरम्यान त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री झाल्यानंतर नांदेडमध्ये सत्काराला यावं अशी विनंतीही केली. 

यावेळी अजित पवारांचं कौतुक करत ते म्हणाले की, "राज्यातील धडाडीचं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. मी शरद पवार, शंकरराव चव्हाण, सुधाकरराव नाईक अशा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम केलं आहे. पण तुमच्याइतकी ऊर्जा, प्रशासनावरील पकड, अभ्यास आणि 18 तास काम करण्याची शारिरीक क्षमता पाहिलेली नाही".

पक्षप्रवेश सोहळा

नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. शेषराव चव्हाण, मार्केट कमिटीचे माजी सभापती सुशांत राठोड, नांदेडचे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष राठोड, नांदेडचे माजी नगरसेवक उदय चव्हाण यांच्यासह अनेकांनी पक्षात प्रवेश केला. 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर चालणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या पक्षात सामील होणाऱ्या प्रत्येकाचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल, असं अजित पवारांनी यावेळी आश्वस्त केलं. तसंच जिल्ह्यातील विकासकामांशी संबंधित सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असा विश्वास व्यक्त केला.