सांगली जिल्ह्यात अजितदादांची 'पॉवर' वाढणार! चार माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार

सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री -माजी आमदार आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत.

सोनेश्वर पाटील | Updated: Mar 20, 2025, 07:19 PM IST
सांगली जिल्ह्यात अजितदादांची 'पॉवर' वाढणार! चार माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Sangli : सांगली जिल्ह्यातील माजी मंत्री -माजी आमदार आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटातील नाराज नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आता घरोबा करण्याचा जवळपास निश्चित केला आहे. तशी एक बैठक देखील पार पडली आहे. त्यामुळे लवकरचं पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट भक्कम करण्यासाठी व्यूह रचना सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन अजित पवार पक्ष आणि नाराज असलेल्या जिल्ह्यातील माजी आमदारांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजित घोरपडे, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख अशा दिग्गज नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

प्रमुख नेत्यांची गुप्त बैठक

विधानसभा निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल झालेले आणि जयंत पाटलांचे कट्टर विरोधक मानले जाणारे निशिकांत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यातूनच दोन दिवसांपूर्वी मिरजेत शासकीय विश्रामगृहात निशिकांत पाटलांच्या प्रमुख उपस्थितीत माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप,माजी मंत्री अजित घोरपडे ,माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख या प्रमुख नेत्यांची गुप्त बैठक पार पडली. ज्यामध्ये अजित पवार गटात प्रवेश करण्याबाबत चर्चा झाली असून अधिवेशनानंतर अजित पवारांबरोबर चर्चा होऊन त्यांचा पक्षप्रवेश होईल. असं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

विलासराव जगताप यांनी भाजपाला रामराम करत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपा विरोधात काम केलं. तर माजी मंत्री अजित घोरपडे यांनी विधानसभेला अजित पवार गटाच्या संजयकाका पाटलांना साथ दिली. तर शिराळ्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक पक्षासोबत राहिले होते. तर आटपाडीचे नेते माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी शरद पवार गटात दाखल होऊन अपक्ष म्हणून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. मग आता या चारी नेत्यांना पक्षाच्या आधाराची गरज आहे. त्यामुळेच की काय आता त्यांनी भाजप ऐवजी सत्तेतल्या राष्ट्रवादीतल्या अजित पवार पक्षात जाण्याचे सोयीचं वाटत आहे. 

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अजित पवारांशी चर्चा करून या चारही नेत्यांचा पक्षप्रवेश होईल. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात लवकरच अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गट अधिक प्रबळ होईल अशी चर्चा सुरू झाली आहे आणि जयंत पाटलांना त्याच्या माध्यमातून चेकमेट मिळेल असेही बोलले जात आहे.