Rare Species: गडचिरोली जिल्ह्यात मासेमारांना दुर्मिळ प्रजातीचा सकरमाऊथ कॅट फिश आढळला. शहरालगतच्या कठाणी नदीत मासेमारी करताना हा मासा आढळला. दक्षिण अमेरिकेतील मूळ प्रजाती असलेल्या हा मासा जलीय पर्यावरणासाठी घातक असल्याचे म्हटले जाते. घरातल्या फिश टॅंकमध्ये शोभेसाठी ठेवला जाणारा हा मासा चक्क नदीत आढळल्याने पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. हा मासा इतर सर्व माशांना वेगवान पद्धतीने संपवित असल्याने हौशी मासे प्रेमी व नागरिकांना सतर्कतेचा इशारा पर्यावरण प्रेमीनी दिलाय.
गडचिरोली जिल्ह्यात मासेमारांना दुर्मिळ प्रजातीचा सकरमाऊथ कॅटफिश आढळला आहे. शहरालगतच्या कठाणी नदीत मासेमारी करताना त्यांना हा मासा आढळला. गडचिरोली जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय विकास विभागाचा अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती देताना हा मासा दक्षिण अमेरिकेतील मूळ प्रजाती असल्याचे सांगत मासा जलीय पर्यावरणासाठी घातक असल्याचे स्पष्ट केले आहे.
मुख्यत्वे घरातल्या फिश टॅंक मध्ये शोभेसाठी ठेवला जाणारा हा मासा कुणीतरी निष्काळजीपणे चक्क नदीत सोडल्याने पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. या माशाचे वरचे आवरण टणक असल्याने आणि मांसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने मासा खाद्य म्हणून उपयोगात येत नाही.
पाण्याच्या तळाशी वास्तव्य करणारा सकरमाऊथ कॅटफिश मासा इतर सर्व माशांना व त्यांच्या अंड्याना वेगवान पद्धतीने संपवित असल्याने हौशी मासे प्रेमी व नागरिकांना पर्यावरण प्रेमींनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. याचे पुनरुत्पादन प्रचंड वेगाने होते. या माशाचा जीवनकाळ 15 वर्षे असून महाराष्ट्रात याविषयी आधीच तलाव व जलाशयात नोंदी आढळल्या असल्या तरी गडचिरोली जिल्ह्यात मात्र हा मासा प्रथमच आढळला आहे.