)
Ganesh Naik Vs Eknath Shinde: नवी मुंबई हे ठाणे जिल्ह्यातील राजकीय संघर्षांचं मोठं केंद्र ठरते. इथं महायुतीमध्येच ठिणगी पडली आहे. वनमंत्री गणेश नाईक आणि शिवसेना शिंदे गटात विस्तवही जात नसल्याचं चित्र आहे. आता ही एका कार्यक्रमात गणेश नाईकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव न घेता हल्लाबोल चढवला. नालायक लोकांच्या हातात सत्ता गेली तर नवी मुंबईचं वाटोळं होईल, असं म्हणत गणेश नाईकांनी अप्रत्यक्षपणे शिंदेंवर टीकास्त्र डागले. त्याला शिवसेनेनंही प्रत्युत्तर दिले. उठसूट टीका खपवून घेणार नसल्याचा इशारा मंत्री उदय सामंतांनी दिला.
शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनीही गणेश नाईकांना चोख प्रत्युत्तर दिले. एका सर्वेक्षणाचा दाखला देऊन वाघमारे यांनी गणेश नाईकांना टोला लगावला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी जनता दरबार घेण्यावरूनही नाईक आणि शिंदेंमध्ये संघर्ष झाला होता. जनता दरबार घेत गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. ठाण्यात माझ्या रेंजचा नेता नाही असं म्हणत गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिंदेंवर निशाणा साधला होता. याआधी देखील गणेश नाईकांनी अनेकदा एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले. नवी मुंबईत सत्ता मिळवून दिलीय. ठाण्यातही सत्ता मिळवून देऊ शकतो मात्र, त्यासाठी रावणाच्या अंहकाराचं दहन करावं लागेल असा हल्लाबोल गणेश नाईकांनी केला होता.
9 सप्टेंबरला गणेश नाईकांच्या उपस्थितीत ठाण्यात भाजप कार्यकर्ते, पदाधिका-यांची बैठक पार पडली. यावेळी गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला होता. नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो. त्यासाठी रावणाच्या अंहकाराचे दहन करावे लागले. त्यासाठी तुम्ही तयार आहात का? कार्यकर्त्यांना विचारला. यानंतर 18 ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली. मुख्यमंत्री झाले, कमावलेलं टिकवता आलं पाहिजे, नाईकांचा टोला लगावला. 27 जून रोजी नवी मुंबईचे वैरी बाहेरचे आहेत, असं म्हणत नाईकांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. एकनाथ शिंदेंच्या काळात कामं झाली नसल्याची टीकाही गणेश नाईकांनी केलेली.
शिंदे विरुद्ध नाईक हा संघर्ष जगजाहीर आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीतही शिंदे-नाईक वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.