कोल्हापुरात राजकीय भूकंप; फडणवीस-शिंदेंच्या एका भेटीने बदलली हवा; गोकुळच्या दूधाला वादाची उकळी

डोंगळे यांच्या भूमिकेनंतर गोकुळचे नेते सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना एक प्रकारे त्यांनी कात्रजचा घाट दाखवण्यात आला आहे  

शिवराज यादव | Updated: May 15, 2025, 08:40 PM IST
कोल्हापुरात राजकीय भूकंप; फडणवीस-शिंदेंच्या एका भेटीने बदलली हवा; गोकुळच्या दूधाला वादाची उकळी

कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक सत्ता केंद्र असणाऱ्या गोकुळमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. गोकुळचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. डोंगळे यांच्या भूमिकेनंतर गोकुळचे नेते सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना एक प्रकारे त्यांनी कात्रजचा घाट दाखवण्यात आला आहे. 

गोकुळ दूधसंघाच्या राजकारणाला पुन्हा एकदा उकळी फुटल्याचं पाहायला मिळत आहे. गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरूण कुमार डोंगळे यांनी राजीनामा द्यायला नकार दिला आहे.  सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात ठरलेल्या फॉर्म्यूल्यानुसार डोंगळे 15 मे रोजी राजीनामा देणार होते. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर डोंगळेंनी यु-टर्न घेतला आहे. त्यामुळे डोंगळेंची ही भूमिका म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी मंत्री सतेज पाटील या जिल्ह्यातील नेत्यांना मोठा धक्का मानला जात आहे.

तर गोकुळचा अध्यक्ष हा महायुतीचाच व्हावी अशी अपेक्षा भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली आहे. त्यासंदर्भात सगळं सकारात्मक सुरू असल्याचंही ते सांगायला विसरले नाहीत.

तर अरूण कुमार डोंगळे वगळता सर्व सत्ताधारी संचालक एकसंध असल्याचं ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी म्हटलं आहे. हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील जो निर्णय घेतली त्या प्रमाणे काम करणार असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.

गोकुळ दूध संघ नेहमीच कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. आमदारकीपेक्षा गोकुळचं संचालकपद हवं अशी जिल्ह्यातील नेत्यांची भूमिका असते. आता वर्षभरात गोकुळची निवडणुक लागणार आहे. त्यातच गोकुळचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.