किल्ले रायगडची रोप वे सेवा आजपासून सुरू
किल्ले रायगडावर येणारे शिवभक्त आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी
प्रफुल्ल पवार, झी मीडिया, अलिबाग : किल्ले रायगडावर येणारे शिवभक्त आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. किल्ले रायगडवर जाण्यासाठी असलेली रोप वेची सेवा आजपासून (शुक्रवार) सुरू झालीय. त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे. मागील ८ महिन्यांपासून ही सेवा बंद होती.
आधी कोरोना आणि नंतर जागेचा वाद यामुळे अनलॉक होवून पर्यटन सुरू झाले तरी रोप वे काही सुरू झाला नव्हता. रायगडच्या पायथ्याशी असलेलया गावातील स्थानिक नागरीकांच्या जागेवरून हा वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण अखेर महाडच्या न्यायालयात गेले. न्यायालयाने मागील आठवडयात वादग्रस्त जागा वगळून रोप वे सुरू करण्यास परवानगी दिली होती.
त्यानंतर रोप वेच्या देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. ते काम पूर्ण झाल्यानंतर चाचणी झाली . ती यशस्वी झाल्यानंतर आज सकाळपासून रोप वे ची सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. सकाळी पहिली ट्रॉली किल्ले रायगडकडे रवाना झाली.
बालवृदध महिलांना ही मोठी संधी पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे. पूर्वी रायगडला फक्त पायी चढून जावे लागत होते परंतु रोप वे ची सेवा उपलब्ध झाल्यापासून रायगडावर येणारया शिवभक्त आणि पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे . दरवर्षी लाखो लोक किल्ले रायगडला भेट देतात.
रायगडबरोबरच पाचाड येथे असलेली राजमाता जिजाऊंची समाधीलाही शिवभक्त आवर्जून भेट देत असतात. लॉकडावूननंतर पर्यटन सुरू झाले परंतु रोप वे सुरू झाला नव्हता. परिणामी पर्यटक फारसे फिरकत नव्हते. आता रोप वे सुरू झाल्याने पर्यटकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे स्थानिक व्यासायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे. हॉटेल, लॉजींग, घरगुती राहण्याची जेवणाची व्यवस्था करणारे तसेच ताक विक्रेते इतर वस्तुंची विक्री करणारे यांना मोठा दिलासा मिळालाय.
रोपवे सुरू झाला ही आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे छोटयामोठया व्यावसायिकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटणार आहे. आता इथलं जनजीवन पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा पाचाड येथील हॉटेल व्यावसायिक अनंत देशमुख यांनी व्यक्त केली.