गुढीपाडव्याला आमरस पुरीचा बेत बोंबलणार; हापूस आंब्याचा दर पाहून डोक्यावर हात माराल

Gudhi Padwa 2025 : यंदाचा गुढीपाडवा आमरसाशिवाय? गगनाला भिडले आंब्याचे दर. पाहा तुमच्या नजीकच्या बाजारात किती रुपयांना विकला जातोय हापूस...   

सायली पाटील | Updated: Mar 19, 2025, 11:50 AM IST
गुढीपाडव्याला आमरस पुरीचा बेत बोंबलणार; हापूस आंब्याचा दर पाहून डोक्यावर हात माराल
Gudi Padwa 2025 alphonso hapus mango rate hike latest update

Gudhi Padwa 2025 : गुढीपाडवा... मराठी नववर्षाचा पहिला दिवस. अशा या सणाच्या दिवशी अनेकांच्याच घरी या मोसमातील फळ असणाऱ्या आंब्याचा एखादा तरी पदार्थ बनवला जातो. मग तो आमरस असो किंवा आंबेडाळ असो. पण, यंदाचा गुढीपाडवा मात्र अपवाद ठरू शकतो. कारण ठरणार आहे ते म्हणजे आंब्याचे वधारलेले दर. 

आंब्याचा मोसम सुरू झाला असला तरीही सध्या अपेक्षित प्रमाणात हे फळ बाजारात आलेलं नाही. हवामानातील बदलांचा कोकणातील 
हापूस आंब्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असून अपेक्षित थंडी न पडल्याने पहिल्या बहरातील मोहोर गळून पडला आणि यंदाच्या हापूसच्या लागवडीवर परिणाम झाला. त्यामुळे यंदा तीस ते चाळीस टक्के उत्पादनाचीच अपेक्षा बागायतदारांकडून केली जात आहे. 

आंब्याचं उत्पादनच कमी असल्यामुळं यावेळी पाडव्याच्या मुहूर्तावरही फळाचे दर कमी झाले नसून उलटपक्षी या दरात दुपटीने वाढ झाली आहे. जिथं आंबा 1500 ते 2000 रुपये डझन इतक्या दरानं सध्या विकला जात आहे. मार्च महिन्यात हेच दर 800 ते 1200 रुपयांच्या घरात होते. पण, यावेळी मात्र त्यात मोठी वाढ झाल्यानं आंब्यापासून खवैय्यांना दूर राहावं लागत आहे. 

हेसुद्धा वाचा : मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांचा का होतोय संताप? एक निर्णय ठरतोय कारणीभूत.... 

आंब्याचं उत्पन्न का घटलं? 

2024 मध्ये कोकणात यंदा पावसाचा मुक्काम लांबला आणि त्यामुळं आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया उशिरानं सुरू झाली. त्यातच थंडी कमी पडल्यानेसुद्धा मोहोर कमी आला आणि त्यानंतर नंतर उष्णतेने आंबा गळती मोठ्या प्रमाणात झाली आणि आंब्याच्या एकंदर उत्पादनावर याचा परिणाम झाला. 
हवामानाचा दुष्परिणाम होत असतानाच काही आंबा बागायतदारांना कीडरोगांचा मारा आणि त्याचे परिणाम सोसावे लागले. ज्यामुळं यंदा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आंब्याची आवक सुरू राहील आणि आंब्याचा हंगाम लवकर उरकला जाईल. त्यामुळं आंबा आता नेमका खायचा तरी कधी हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.