शुभम कोळी झी 24 तास ठाणे : बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर भागात वन विभागाने प्राणी गणना केलीये. याकरिता आठ मचाण बसविण्यात आले होते. यावेळी पाणवठ्यावर मुंगूस, सांबर, लंगूर, रानमांजर, सर्प, गरुड असे प्राणी आणि पक्षी मिळून ६१ वन्य जीवांची नोंद करण्यात आली आहे. यात सर्वाधिक १९ वटवाघूळांची संख्या होती. मात्र यंदा येऊर वनपरिक्षेत्रात या प्राणी गणनेत एकही बिबट्याचे दर्शन घडले नाही. ढगाळ वातावरणामुळे प्राणी बाहेर पडल्याचे प्रमाण कमी होते अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आलीये.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा 60 टक्के भाग येऊरचं जंगल आहे. या जंगलात माणसाचा वावर वाढल्यानं प्राण्यांनी तिथून पळ काढायला सुरुवात झालीये. बुद्धपौर्णिमेला झालेल्या प्राणीगणनेत ही धक्कादायक आकडेवारी समोर आलीये. धक्कादायक बाब म्हणजे बिबट्यांचा वावर असलेल्या येऊरमध्ये यावेळी एकही बिबट्या आढळलेला नाही.
सांबर - 01
रानमांजर - 01
रानडुक्कर - 03
वानर - 17
घुबड - 07
वट वाघूळ - 19
मुंगूस - 03
माकड - 08
सर्प,गरुड - 01
रानकोंबडा - 02
एवढ्याच प्राण्यांची नोंद झालीये.प्राणी गायब होण्यामागं बदलतं हवामान असल्याचा शोध वनविभागानं लावला आहे. येऊरच्या जंगलात वाढतं अतिक्रमण, बंगल्यांवर होणा-या पार्ट्या आणि रात्री उशिरापर्यंत जंगलाच्या आतल्या भागातील मानवी वावर यामुळं जंगलातले प्राणी दुसरीकडं पळाल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत प्राण्यांची संख्या निम्म्यानं घटणं ही धोक्याची घंटा आहे. वनविभागानं नवी कारणं शोधण्याऐवजी येऊरचं जंगल प्राणीस्नेही कसं राहिल यासाठी उपाययोजना करणं गरजेचं झालं आहे.