राज्यात उन्हाची काहिली वाढणार, तर 'या' जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा धोका, कसे असेल आजचे हवामान?

Maharashtra Weather Update:  आज राज्यातील हवामान कसे असेल जाणून घेऊया अपडेट

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 23, 2025, 07:12 AM IST
राज्यात उन्हाची काहिली वाढणार, तर 'या' जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा धोका, कसे असेल आजचे हवामान?
heat wave likely to increase in the maharashtra

Maharashtra Weather Update: उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. येत्या काही दिवसांत राज्यात उन्हाची काहिली आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजचे हवामान कसे असेल, जाणून घेऊया. 

अग्नेय उत्तर प्रदेशापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा छत्तीसगडमधील चक्राकार वाऱ्यात मिसळला आहे. त्यामुळं बंगालच्या उपसागरात बाहेरच्या दिशेने अँटी सायक्लोन असल्याने पूर्व आणि मध्य भारतात वाऱ्यांचा संगम होत असून यामुळं राज्यात पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

आज मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे विजांसह पावसाची शक्यता आहे. तर, उर्वरित राज्यात उन्हाची काहिली वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरणामुळं तापमानाचा पारा चढणार आहे. 

दरम्यान, हवामान विभागाने शनिवारी विदर्भाला अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. तसंच बई शहर आणि उपनगरात  शनिवारी ढगाळ वातावरण असेल, असाही अंदाज वर्तवला होता. 

तापमान आणखी वाढणार

मार्च महिन्याच्या शेवटी उन्हाचा तडाखा जाणवू लागला असून, एप्रिलमध्ये ४२ अंश सेल्सिअसवर तापमान जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. साधरणतः एप्रिल आणि मे महिन्यात जास्त उकाडा जाणवतो. अजून ४० अंशांवर तापमान गेले नसले तरी ढगाळ वातावरणामुळे उकाडा जास्त जाणवतो.