High blood pressure Patients in Maharashtra: आता आपल्या सगळ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात उच्च रक्तदाबाचे रुग्ण आता वाढतायेत. बदलती जीवनशैली, मानसिक तणाव, अपुरी झोप याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय. सध्या राज्यात उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढतीये. जी आपल्या सगळ्यांसाठीच धोक्याची घंटा आहे.
मुंबई,पुणे या महानगरांसह राज्यातील सगळ्याच ठिकाणी आता जनजीवन बदललंय. आयुष्याची रचनाच बदलत चाललीये...आणि याची परिणीती म्हणजे राज्यात उच्च रक्तदाबाचे रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालीये.नोकरीच्या बदलत्या वेळा, कामातील ताण, मानसिक तणाव, झोपेचं बिघडलेलं चक्र यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतोय. राज्यात उच्चरक्तदाब असलेल्या रुग्णांची संख्या अन्य आजारांच्या तुलनेत अधिक आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 30 वर्षांवरील नागरिकांची उच्च रक्तदाब तपासणी आली. यामध्ये 28 लाख 97 हजार नागरिकांना उच्च रक्तदाब असल्याचे निदान करण्यात झालंय. उच्च रक्तदाबाची काही प्रमुख लक्षणं आहेत. ती दिसली तर वैद्यकीय तपासणी केलीच पाहिजे
डोकेदुखी
छातीत दुखणे
चक्कर येणे
दृष्टीभ्रम,नाकातून रक्त येणे
थकवा, हृदयाची धडधड
श्वासोच्छ्वासाला त्रास, धाप लागणे
उच्च रक्तदाबाला दूर ठेवण्यासाठी आपल्या दिनचर्येत तुम्ही काही बदल करू शकता.
आपल्या डाएटवर लक्ष द्या. अती तेलकट, वारंवार बाहेरचं खाणं टाळा
वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवा. अती वजनामुळेही ब्लड प्रेशर वाढतं
आपल्या आहारात मीठाचा वापर कमी करा
जास्त ताण-तणाव घेऊ नका, आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या
योग आणि मेडीटेशन ताण-तणाव कमी करण्यास मदत करते
संतुलित आहार, फळं, भाज्या यांचं आहारात प्रमाण वाढवा
जेवणासह तुम्ही पाणी पिण्याची सवय वाढवा
तंबाखू आणि मद्य सेवन टाळा
आपल्या सगळ्यांचं आयुष्य आता धकाधकीचं आणि धावपळीचं झालंय.त्यामुळे चाळीशीत येणारे आजार आता तिशीतच आपल्याला होतायेत.ऑफीस, कार्यालयाच्या बदलत्या वेळा, कामाचा व्याप, ताण सोबतच मोबाईलचा अतिवापर यामुळे बीपीचा त्रास वाढतोय.पण ताण तणाव बाजूला ठेवत मेडीटेशन आणि योग्य संतुलित जीवनशैली अनुसरल्यास उच्च रक्तदाबाला आपण दूर ठेवू शकतो.आणि हो ताण-तणाव बाजूला ठेवून आनंदी राहा.