महाराष्ट्रात बनलयं भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल; 500 क्रूझ, 10 लाख प्रवासी आणि...

भरातातील पहिले क्रूज टर्मिनल मुंबईत बनले आहे, 10 लाख प्रवासी क्षमेतेच्या या क्रूज टर्मिनलवर 500 क्रूज तांबू शकतात. 

वनिता कांबळे | Updated: Mar 19, 2025, 04:45 PM IST
महाराष्ट्रात बनलयं भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल; 500 क्रूझ, 10 लाख प्रवासी आणि...

India First International Cruise Terminal In Mumbai : भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल आपल्या महाराष्ट्रात बनले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने (बीपीटी) देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल निर्माण केले आहे. लावकरच हे  क्रूझ टर्मिनल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.  4 लाख फूट क्षेत्रावर निर्माण करण्यात आलेल्या या  क्रूझ टर्मिनलवर एकाचवेळी  500 क्रूझची वाहतूक होऊ शकते. 10 लाख प्रवासी क्षमेतेचे हे क्रूझ टर्मिनल आहे. 

देशी आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जल वाहतुक विकसीत करण्याच्या अनुषंगाने हे जागतिक दर्जाचे  क्रूझ टर्मिनल उभारण्यात आले आहे. मागील काही महिन्यात मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रूझची संख्या वाढली आहे. सध्या, दरवर्षी सुमारे 50 आंतरराष्ट्रीय क्रूझ मुंबईत दाखल होतात. दरवर्षी शेकडो देशांतर्गत क्रूझ चालतात. टर्मिनस सुरू झाल्यानंतर, मुंबईत येणाऱ्या क्रूझची संख्या झपाट्याने वाढण्याची अपेक्षा आहे.

जलवाहतुकीला चालना देण्यासाठी मुंबईत हे क्रूझ टर्मिनल उभारण्यात आले आहे.  अतिशय भव्य असे हे तीन मजली टर्मिनल तयार केले जात आहे. तळमजला आणि पहिला मजला देशांतर्गत आणि परदेशी प्रवाशांसाठी वापरला जाणार आहे. तर, दुसरा आणि तिसरा मजला भाेडे तत्वावर दिला जाणार आहे. 4 लाख फूट कॉम्प्लेक्समध्ये बांधल्या जाणाऱ्या टर्मिनलचा 2 लाख फूट क्षेत्रफळ व्यावसायिक वापरासाठी देऊन 15 ते 20 वर्षांत खर्च वसूल करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

टर्मिनल तयार झाल्यानंतर ऑपरेशनची जबाबदारी बीपीटीकडून एका खाजगी ऑपरेटरकडे दिली जाणार आहे. ट्रस्टने ऑपरेटर निवड प्रक्रिया पूर्ण केली आहे. टर्मिनलच्या इंटेरियरचे अत्यंत किरकोळ काम ळिल्लक राहिले आहे. लवकरच क्रूझ टर्मिनलचे अधिकृत उद्घाटन केले जाणार आहे. टर्मिनसमध्ये प्रवासी काउंटर, कस्टम, इमिग्रेशन काउंटर आणि इतर कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत.