Monsoon In India: देशात गेल्या काही वर्षांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. मार्च महिन्यापासून देशात उकाडा सुरू झाला आहे. एप्रिल -महिन्यात तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर देशात यंदा मान्सूनला पोषक स्थिती राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तसंच, देशात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस यंदा होऊ शकतो.
देशात 2025मध्ये जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरीच्या दरम्यान 105 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस होईल. तर महाराष्ट्रात पुरेसा पाऊस कोसळणार आहे. मान्सूनवर अल निनोचा धोका नसल्याने देशात चांगला पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूजंय महापात्रा आणि शास्त्रज्ञ आर. के. जेनामणी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. आयएमडीचा पुढील अंदाज मेच्या शेवटच्या आठवड्यात जारी करणार आहेत.
नैऋत्य मान्सून 105 टक्के वर राहू शकतो. त्याचवेळी अल निनोची स्थिती तटस्थ राहू शकते. मराठवाड्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल. तर, मध्य महाराष्ट्रातही चांगल्या पावसाची अपेक्षा असणार आहे. यासह कोकण आणि विदर्भातही पाऊस सरासरी ओलांडेल, असा अंदाज आहे. मान्सून वेळेवर सुरू होईल म्हणजेच जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये पोहोचणार आहे, असाही हवामान विभागाचा अंदाज आहे.
प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान तटस्थ राहण्याची शक्यता असून सरासरीच्या तुलनेत आयओडीही तटस्थ राहील. यासह उत्तर गोलार्थामध्ये हीम अच्छादनाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल, ही परिस्थिती चांगल्या मान्सूनसाठी लाभदायी ठरते. त्यामुळं देशात यावर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.