भारतात किती पाकिस्तानी हेर? भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उचलला नेटवर्क उद्धवस्त करण्याचा विडा!

Pakistan spies In India: पानीपतमधूनही नोमान इलाही नावाच्या एका हेराला सुरक्षा यंत्रणांनी अटक केलीय. 

प्रविण दाभोळकर | Updated: May 14, 2025, 09:43 PM IST
भारतात किती पाकिस्तानी हेर? भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उचलला नेटवर्क उद्धवस्त करण्याचा विडा!
पाकिस्तानी हेर

Pakistan spies In India: भारताचं अन्न खाऊन पाकिस्तानची चाकरी करणा-यांची संख्या भारतात कमी नाही. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणा-यांची पाळंमुळं खोदून काढण्याची मोहीम सुरु केलीये. पानीपत आणि भटिंडामधून दोन हेरांना भारतीय सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतलंय.

भारतातल्या दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यासाठी भारतीय लष्कर, गुप्तचर संस्था रॉ आणि आयबीनं कंबर कसलीय. भारतातून दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्याची हीच नेमकी वेळ आहे. त्यामुळंच दहशतवादाचं संपूर्ण नेटवर्क उद्धवस्त करण्याचा विडाच सुरक्षा यंत्रणांनी उचललाय. याचसोबत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणा-या हेरांचं नेटवर्कही उखडून फेकण्याची तयारी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी केलीय. 

पंजाबच्या भटिंडामधून एका हेराला अटक केली असून रकीब असं या हेराचं नाव आहे. रकीब मूळचा हरिद्वारच्या डोसनी गावचा रहिवासी असून भटिंडात तो टेलरिंगचं काम करायचा.लष्कराच्या केन्टोनमेंट परिसराची तो माहिती गोळा करायचा. उत्तराखंडमध्ये राहणारा रकीब पाकिस्तानसाठी हेरगिरी कधी करु लागला याचा यंत्रणा आता तपास करतायेत.

हरिद्वारचा तरुण पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याची माहिती धक्कादायक असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि खासदार त्रिवेंद्रसिंह रावत यांनी म्हटलंय आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणीही त्यांनी केलाय.

पानीपतमधूनही नोमान इलाही नावाच्या एका हेराला सुरक्षा यंत्रणांनी अटक केलीय. नोमान इलाही त्याच्या बहिणीच्या घरी राहत होता. मुळचा यूपीच्या शामली भागातील कैराना इथला तो रहिवासी होता. तो पानीपतमध्ये राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करायचा. पोलिसांनी त्याच्या कैराना इथल्या मूळ गावातही चौकशी सुरु केलीये. सीमावर्ती भागात पाकिस्तानच्या आयएसआयचं मोठं जाळं असण्याची शक्यता आहे. या हेरांमार्फत भारताच्या लष्करी सज्जतेची आणि लष्करी हालचालींची माहिती पाकिस्तानपर्यंत पोहचवण्याचं काम केलं जातं. आता भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हेरांचं जाळं उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केलीय.