मुलीचं लग्न आणखी धुमधडाक्यात करणार, इंदुरीकर महाराजांचं टीका करणाऱ्यांना जाहीर आव्हान

कीर्तनकारांनी कीर्तन करून समाजाला उपदेश केला पण तसं आचरण केलं नाही तर काय होतं हे आपल्याला इंदुरीकर महाराजांवर होत असलेल्या टीकेवरून दिसत आहे  

शिवराज यादव | Updated: Nov 15, 2025, 09:26 PM IST
मुलीचं लग्न आणखी धुमधडाक्यात करणार, इंदुरीकर महाराजांचं टीका करणाऱ्यांना जाहीर आव्हान

कीर्तनकारांनी कीर्तन करून समाजाला उपदेश केला पण तसं आचरण केलं नाही तर काय होतं हे आपल्याला इंदुरीकर महाराजांवर होत असलेल्या टीकेवरून दिसत आहे. त्या टीकेनंतर इंदुरीकर महाराजांनी उत्तर दिलं. पण त्यात त्यांनी टीका करणा-यांना थेट आव्हान दिलं. हे पाहता इंदुरीकरांच्या वागण्यावरही टीका केली जात आहे. 

Add Zee News as a Preferred Source

इंदुरीकर महाराजांची ही मुक्ताफळं पाहिलीत.. त्यांच्या विधानांमुळे ते अनेकदा टीकेचे धनी झालेत. पण जेव्हा समाजातून त्यांच्यावर टीका झाली तेव्हा मात्र त्यांचा संयम सुटला. गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर इंदुरीकरांना त्यांच्या मुलीच्या शाही साखरपुड्यावरून आणि महागड्या कपड्यावरून ट्रोल केलं जात आहे. साधेपणानं लग्न केली तरी मुलं होतात, ते पैसे जपून ठेवा, असा सल्ला देणारे इंदुरीकर महाराज स्वत: मात्र त्याउलट वागले. बरं, टीका झाल्यावर गप्प राहतील, ते इंदुरीकर कसले, त्यांनी त्रागा करत टीका करणा-यांची लायकी काढली. आता नवा व्हिडिओ समोर आला आहे. साखरपुडा ट्रेलर होता, मुलीचं लग्न आणखी धुमधडाक्यात करणार, बघु कोण काय म्हणतंय, असं आव्हान त्यांनी दिलं..

कीर्तन ही महाराष्ट्राची परंपरा. धार्मिक आणि सामाजिक मुल्यांची बीजं समाजात पेरण्यासाठी कीर्तनकारांचं मोलाचं योगदान राहिलं आहे. कीर्तनानं जनजागृती केलीय. मात्र इंदुरीकर कीर्तनात अनेकदा गरबा खेळायला गेली, मुलगी गायब, मुलीचे फोन तपासा, असं म्हटलं. नव-याला एकेरी हाक मारणा-या बायकांबाबतही त्यांनी केलेलं विधान पचनी न पडणारं होतं. त्यामुळे जनजागृतीची गरज खरंच कुणाला, याचा प्रश्न पडतो.

बोले तैसा चाले हे केवळ उपदेशासाठी नको तर ते आचरणात आणलं पाहिजे. नाही तर लोका सांगे ब्रम्हज्ञान अशी गत होते आणि लोकही बोल लावतात.. मध्यंतरी कीर्तन सोडेन असे संकेत दिलेले इंदुरीकर, आता पुन्हा आव्हान देतायत हे पाहता, इंदुरीकर महाराज हे वागणं बरं नव्हे, असंच म्हणावं लागेल.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More