'खरीप' आणि 'रब्बी' हे 2 शब्द मराठीत आले कुठून? दोघांचा खरा अर्थ फारच रंजक

Origin of Word Kharip And Rabbi: पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेकदा खरीप आणि रब्बी हंगाम हे दोन शब्द वारंवार तुमच्या कानावर पडत असतील. पण हे दोन शब्द नेमके आले कुठून आणि त्यांचा मूळ अर्थ काय?

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 16, 2025, 03:15 PM IST
'खरीप' आणि 'रब्बी' हे 2 शब्द मराठीत आले कुठून? दोघांचा खरा अर्थ फारच रंजक
अनेकदा तुम्हीही हे दोन्ही शब्द ऐकले असतील (प्रातिनिधिक फोटो)

Origin of Word Kharip And Rabbi: कृषीप्रधान देश असलेल्या भारतात खरीप आणि रब्बी हे शेतीचे दोन हंगाम आहेत. अनेकदा शेतीचं नुकसान झालं, किंवा सरकारी अहवालामध्येही खरीप हंगामातील पीक किंवा रब्बी हंगामातील पीक असा उल्लेख आवर्जून आढळून येतो. आपल्यापैकी अनेकांना हे ही ठाऊक आहे की खरीप म्हणजे पावसाळ्यात घेतली जाणारी पिकं आणि रब्बी म्हणजे पावसाळ्यानंतर घेतली जाणारी पिकं. अर्थात आपल्यापैकी अनेकांना हे सारं चौथी-पाचवीलाच शिकवलं जातं. मात्र 'खरीप' आणि 'रब्बी' या दोन शब्दांचा सर्रास वापर केला जात असला तरी त्यांची अर्थ काय? या शब्दांचा जन्म कसा झाला? त्यांचा मूळ अर्थ काय आहे? याबद्दल आपल्यापैकी अनेकांना कल्पनाच नसणार यात शंका नाही. 

कुठून आला खरीप हा शब्द?

'खरीप' आणि 'रब्बी' हे दोन शब्द तयार कसे झाले या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेल्यास यापैकी पहिला शब्द शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे. मराठी भाषेवर फारशी भाषेचा फार प्रभाव दिसून येतो. आज मराठीत वापरल्या जाणाऱ्या अनेक शब्दांचं मूळ फारशी भाषेत आहे. यामध्येच 'खरीप' शब्दाचाही समावेश आहे. खरीप हा मूळ शब्द फारशीमधील 'खरीफ' या शब्दातून आलेला आहे.

फारशीमध्ये खरीफ या शब्दाचा अर्थ पावसाळा असा होतो. म्हणूनच पावसाच्या पाण्यावर जी पिकं घेतली जातात त्याला खरीपाची पिकं म्हणतात आणि पावसाळा सुरु झाल्यानंतर पीक पेरणीचा जो हंगाम सुरु होतो त्याला खरीपाचा हंगाम म्हणतात.

रब्बी शब्दाचा जन्म कसा झाला आणि त्याचा मूळ अर्थ काय?

आता रब्बी या शब्दाबद्दल बोलायचं झाल्यास या शब्दाची निर्मिती किंवा जन्म हा 'रबई' या शब्दापासून झाला आहे. हा शब्द मूळचा अरबी शब्द आहे. या शब्दाचा अरबी भाषेत अर्थ होतो वसंत ऋतू! म्हणूनच वसंत ऋतूमध्ये घेतली जाणारी पिकं ही रब्बी हंगामातील पिकं म्हणून ओळखली जातात. 

मराठीमध्येही आहेत नावं पण

हल्ली आपण 'खरीप' आणि 'रब्बी' हे शब्द वापरत असलो तरी आपल्याकडेही या पिकांच्या हंगामासाठी मराठमोळे शब्द आहेत. आपल्यापैकी कोणालाच याची कल्पना नसेल. मात्र मराठीमध्ये पिकांचे दोन हंगाम ओळखले जातात. खरीप पिकाला 'कार्तिक फळ' आणि रब्बी पिकाला 'वसंत फळ' असं म्हणतात.

तुम्हाला नक्कीच यामधून नवीन माहिती मिळाली असेल अशी आम्हाला खात्री आहे. ही माहिती तुमच्या मित्रांसोबतही नक्की शेअर करा.