सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर, वैष्णोदेवी, ताजमहाल एकाच ट्रीपमध्ये; पुण्यातून स्पेशल ट्रेन! पाहा तिकीट दर, वेळापत्रक

IRCTC Special Train From Pune: रेल्वेने पर्यटनाच्या दृष्टीने ही विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या पुण्यातून सुटणाऱ्या या ट्रेनसंदर्भातील सर्व माहिती.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 15, 2025, 07:50 AM IST
सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर, वैष्णोदेवी, ताजमहाल एकाच ट्रीपमध्ये; पुण्यातून स्पेशल ट्रेन! पाहा तिकीट दर, वेळापत्रक
या विशेष ट्रेनचा तपशील रेल्वेनं जारी केला आहे

IRCTC Special Train From Pune: ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’कडून म्हणजेच 'आयआरसीटीसी'कडून पुणेकरांसाठी विशेष पर्यटन सेवा सुरु करण्यात आली आहे. 'आयआरसीटीसी'ने सुरू केलेल्या पर्यटन रेल्वे सेवेंतर्गत ‘उत्तर भारत देवभूमि यात्रा गुरुकृपासह’ (Uttar Bharat Devbhoomi Yatra with Guru Kirpa) या विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (17 एप्रिल रोजी) पुण्यातून ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. ही यात्रा सुमारे पाच हजार किलोमीटर अंतराची असून या यात्रेदरम्यान हरिद्वार, हृषीकेश, अमृतसर, वैष्णोदेवी (कटरा), मथुरा, वृंदावन आणि आग्रा यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देऊन दहा दिवसांनी ही ट्रेन पुन्हा पुण्यात येणार आहे.

कोणत्या स्थानकांवरुन या ट्रेनमध्ये चढता येणार?

‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार आरक्षण करण्यात येणार असून, 750 आसनक्षमता निश्चित करण्यात आली आहे. इच्छुकांना पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रस्ता, वापी, सूरत, बडोदा या रेल्वे स्थानकांवरून रेल्वेत बसता येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विशेष यात्रेचे आयोजन

दरम्यान, केंद्र शासनाच्या ‘देखो अपना देश’ या योजनेंतर्गत ‘भारतगौरव’ ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे देशभरातून आतापर्यंत 86 गाड्या सोडण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील महाकुंभनिमित्त ‘भारत गौरव’ची विशेष रेल्वे सोडण्यात आली होती. या रेल्वेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच धर्तीवर ‘उत्तर भारत देवभूमि यात्रा गुरुकृपासह’ या विशेष यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पुण्यावरुन सुटणारी गाडी कोणत्या स्थळांना भेट देणार?

हरिद्वार : हृषीकेश, हर की पौडी, गंगा आरती

अमृतसर : सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर

कटरा : माता वैष्णोदेवी दर्शन

मथुरा : वृंदावन, श्रीकृष्ण जन्मभूमी आणि प्रमुख मंदिरे

आग्रा : ताजमहाल

तिकीट किती?

सामान्य श्रेणी (शयनयान) : 18 हजार 230 रुपये

तृतीय श्रेणी (थ्री टीअर) : 33 हजार 880 रुपये

द्वितीय श्रेणी (टू टीअर) : 41 हजार 530 रुपये

प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा देण्यात येणार?

वातानुकूलित सुविधा आणि राहण्याची व्यवस्था

शाकाहारी भोजन (चहा, नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण)

पर्यटनस्थळी उतरल्यानंतरही वातानुकूलित वाहनाची व्यवस्था

विविध धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शक (गाइड)