Jalgaon Crime News: जळगावच्या धरणगावमध्ये एक धक्कादायक प्रकार घटला आहे. नायब तहसीलदार, क्लास वन ऑफिसर असल्याचं सांगून एका व्यक्तीने तरुणींची फसवणूक केली आहे.

प्रतिनिधी उर्वशी खोना झी मीडिया दिल्ली: Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे राहणाऱ्या एका तरुणाने स्वतःला नायब तहसीलदार, क्लास वन अधिकारी असल्याचे भासवत अनेक तरुणींना लग्नाच्या अमिषाने फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीचे नाव निनाद विनोद कापुरे असून तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
निनाद कापुरे याने मॅट्रिमोनियल वेबसाईटवरून तरुणींचे संपर्क क्रमांक मिळवले आणि त्यांच्याशी लग्नाच्या नावाखाली ओळख वाढवली. त्यानंतर स्वतःला सरकारी अधिकारी असल्याचे भासवत त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच मुलींमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी निनाद कापुरने सरकारी गाडीवरील लाल दिवा, तहसीलदारांच्या खुर्चीवर बसलेले फोटो तरुणींना पाठवले. त्याने आपली प्रतिमा अधिकारपदावर असलेल्या व्यक्तीसारखी निर्माण करून तरुणींना आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात ओढले.
15 लाखांची फसवणूक
विनोद कापुरेच्या या फसवणुकीच्या प्रकारात नाशिक व फलटण येथील तरुणी फसवल्या गेल्याचे स्पष्ट झाले असून त्यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी केलेल्या निवेदनानुसार निनादने वेगवेगळ्या बहाण्यांनी एकूण सुमारे 15 लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे.
तक्रारदार तरुणींनी अधिक तपास केल्यानंतर निनाद कापुरेच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आली की, निनादचं पूर्वीच लग्न झालं असून त्याच्या पत्नीने घटस्फोटासाठी नाशिक न्यायालयात केस दाखल केली आहे. हा सर्व प्रकरण तरुणींना समजल्यावर पीडित तरुणींनी त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला.
पोलीस तपास सुरु, कठोर कारवाईची मागणी
या प्रकारामुळे मॅट्रिमोनियल साईटवरून होणाऱ्या फसवणुकीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे आणि फसवणूक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित तरुणींनी केली आहे. निनाद कापुरेच्या या फसवणुकीने अनेक तरुणींचा विश्वास घात केला असून, तो स्वतःला अधिकारी म्हणून सांगत भावनिक आणि आर्थिक दोन्ही पातळ्यांवर फसवणूक करत होता. पोलिस प्रशासनाने तात्काळ याची दखल घेतली असून, यापुढे अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी सतर्कता आणि जनजागृती गरज असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.