जळगाव हादरलं! 31 डिसेंबरचा 'तो' वाद अन् रागातून माजी उपसरपंच तरुणाचा निर्घृण खून, आरोपी गावातीलच!

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यात एका माजी उपसरपंचाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 23, 2025, 08:39 AM IST
जळगाव हादरलं! 31 डिसेंबरचा 'तो' वाद अन् रागातून माजी उपसरपंच तरुणाचा निर्घृण खून, आरोपी गावातीलच!
jalgaon crime News three youth killed Former Deputy Sarpanch Yuvraj Koli

Jalgaon Crime News: जळगावातील  कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती समोर आली आहे. गावातीलच तिघांनी युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढविला. आरोपींनी त्यांच्यावर चाकू आणि चॉपरने वार केले त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींपैकी दोन आरोपींना घेतले ताब्यात आहे.

काय घडलं नेमकं?

३१ डिसेंबर रोजी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत आरोपी आणि मयत उपसरपंच यांच्यात वाद झाले होते. या वादानंतर मयत युवराज कोळी यांना आरोपींनी फोन वर धमकी दिली होती. त्यानंतर 21 मार्च रोजी सकाळच्या सुमारास युवराज कोळी पत्नी आणि बहिणीला दुचाकीवरुन शेतात सोडून परत घरी येत असताना आरोपींनी सकाळी 8च्या सुमारास त्यांच्यावर चाकुने हल्ला केला. त्यातच युवराज कोळी यांचा मृत्यू झाला. 

युवराज कोळी हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा कार्यकर्ता असल्याने त्याला चांगले काम मिळत होते त्यामुळे त्याच्यावर असलेल्या रागातून या आरोपींनी त्याचा खून केल्याचा आरोप मयत युवराज कोळी यांच्या बहिणीने केला आहे. पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोधासाठी पथक रवाना केले असून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत पोलिसांनी विलंब न करता तपास केला असता त्यांना न्याय मिळाला असता. तर आज जळगाव मध्ये हे सरपंच हत्या प्रकरण घडलं नसतं. महाराष्ट्र हे बिहारकडे वाटचाल करीत आहे. पोलिसांचा वचप राहिला नाही. सत्ताधाऱ्यांच्या सरपंचाला व उपसरपंचाला न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेला व विरोधीपक्षातील जनतेला कसा न्याय मिळणार असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे. 

एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

जळगाव जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. या राज्यात सरपंच हे आता सुरक्षित राहिलेले नाहीत. सरपंचाची हत्या या राज्यात व्हायला लागल्यात. लोकप्रतिनिधी देखील सध्या सुरक्षित नाहीत. राज्यात महिला सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काल जळगावातील उपसरपंचाची हत्या झाली. धरणगावात एका मुलीची छेड काढण्यात आली, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.