Sunetra Pawar Victory in Baramati By Election: बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा मोठा विजय झाला असला तरी, याचा जल्लोष किंवा सेलिब्रेशन होणार नाही. सुनेत्रा पवार यांनी आवाहन केलं आहे.

Sunetra Pawar Victory in Baramati By Election: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत 24 व्या फेरी अखेर सुनेत्रा पवारांना 2 लाख 18 हजार 930 इतकी मतं मिळाली आहेत. उत्तर प्रदेशच्या साहिबाबाद मधील सुनील कुमार शर्मा यांचा रेकॉर्ड सुनेत्रा पवारांनी मोडला आहेत. 2022 च्या निवडणुकीत सुनील कुमार शर्मांना 2 लाख 14 हजार 835 मतं मिळाली होती. मात्र इतक्या मोठ्या विजयानंतरही बारामतीत कोणताही जल्लोष किंवा सेलिब्रेशन होणार नाही.
पुण्यातील भोरमध्ये चिमुरडीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर बारामतीमधील विजयाचं सेलिब्रेशन केलं जाणार नाही असं जय पवार यांनी माध्यमांशी संवाद साधाताना सांगितलं. याशिवाय अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक होत असल्याने ती पार्श्वभूमीदेखील आहे.
सुनेत्रा पवारांनी जल्लोष न करण्याचं आवाहन केल्यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, "दादांशिवाय निवडणुकीला सामोरं जावं लागेल असं वाटलं नव्हतं. पण नियतीमुळे झालं. तसंच दोन दिवसांपूर्वी भोरमध्ये वाईट घटना घडली आहे. त्यामुळे आम्हाला आनंदाचा दिवस वाटत नाही. वहिनींना तातडीने कशाप्रकारे न्याय मिळेल हे पाहिलं. मीदेखील जल्लोष करु नका अशी विनंती करतो".
"मी सर्व बारामतीकरांचे मनापासून आभार मानतो. दादांसाठी त्यांनी निवडणूक मनावर घेतली आणि इतिहास घडवला. त्यांनी दादांच्या प्रेमासाठी हे केल्याने त्यांचे आभार मानतो," असं जय पवार यांनी म्हटलं आहे. सर्वांनी एकत्र येत कष्ट घेतले आहेत. कार्यकर्ते, पोलिंग एजंट सर्वांनी मेहनत घेतली आहे. त्यांचे आभार मानतो असं त्यांनी सांगितलं.
2029 ची ही तयारी आहे का? असं विचारलं असता त्यांनी म्हटलं की, "2029 मध्ये लोकांची आशा आहे असं सांगितलं होतं. 2029 ची तयारी सुरु आहे असं काही नाही. दादा एक आधार होते, वहिनी जेव्हा मुंबईत असतील तेव्हा आधार देत काम केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे".
लोकांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रत्येक गुरुवारी 'जनता दरबार' आयोजित करण्याची घोषणा केली आहे. आधी त्यांनी मंगळवारी जनता दरबार घेण्याचे ठरवले होते, पण सोमवार-मंगळवारी ते मुंबईत असल्याने आता हा दरबार दर गुरुवारी घेतला जाईल.