)
नितेश महाजन, झी २४ तास, जालना : जालन्यातील माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकरांमध्ये सामना रंगलाय. आता या वादाचा नवा अंक समोर आलाय. गोरंट्याल विरुद्ध खोतकर हा वाद दोन्ही नेत्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचलाय. (Kailash Gorantyal and Arjun Khotkar Maharashtra politics marathi news jalne news)
कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानंतर अर्जुन खोतकर विरुद्ध गोरंट्याल असा संघर्ष सुरू झालाय. गोरंट्याल विरुद्ध खोतकर वादाचा नवा अंक आता समोर आलाय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपनं खेळी करून गोरंट्याला यांना पक्षात आणलं. हे शिवसेनेच्या चांगलंच जिव्हारी लागल्याचं चित्र आहे. म्हणूनच गोरंट्याल आणि खोतकर यांच्यातले वाद आता कुटुंबापर्यंत पोहोचलेत. गोरंट्याल यांनी खोतकर यांच्या आईंचा उल्लेख करत त्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं आपल्याकडे असल्याचा इशारा दिला होता. त्याला आता खोतकरांनी प्रत्युत्तर दिलंय.
गोरंट्याल यांनी त्यांच्या आईचे कसे हाल केले हे सांगतानाची गोरंट्याल यांच्या भावाची क्लिप आपल्याकडे असल्याचा दावाही खोतकरांनी केलाय. या दोन्ही नेत्यांमधील कौटुंबिक वादाला खरी सुरुवात झाली ती जालना महानगरपालिकेवरून. कैलास गोरंटयाल यांच्या पत्नी संगीता गोरंटयाल या जालना नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा असताना अनियमितता झाल्याचा आरोप अर्जुन खोतकरांनी विधानसभेत उपस्थित केला होता. खोतकरांची अनेक प्रकरणं आपल्याकडे असल्याचा ईशारा गोरंटयाल यांनी दिला होता. मग खोतकर यांनीही याबाबत स्पष्टीकरण देत तुमच्या पत्नी सार्वजनिक जीवनात आहेत, त्या 5 वर्ष जालना नगर परिषदेच्या नगराध्यक्षा राहिल्या तेव्हा अनियमितता झाल्याचा आरोप केला. दरम्यान, त्या नगराध्यक्षा असल्यानं त्यांच्यावर टीका होणारच असं खोतकरांनी म्हटलंय.
कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकरी हे दोन्ही जालन्यातील बडे नेते आहेत. दोघांचेही हजारो समर्थक आहेत. दोघांचीही शक्तीस्थानं बळकट आहेत. पण आता गोरंटयाल आणि खोतकर युतीच्या एकाच छत्राखाली असताना असे वाद थांबले नाहीत, तर दोघांच्या पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या दोन्हीही नेत्यांकडून काय बोध घ्यायचा, हा प्रश्न उभा राहिलाय.