Kishori Pednekars: दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात पुन्हा एकदा चर्चेत आलंय. 2020 साली मुंबईत दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनचा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला होता. पण या घटनेच्या 5 वर्षांनंतर सामूहिक बलात्कार करुन दिशाची हत्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत ही माहिती दिली. दिशाने आत्महत्या केली नसून तिचा बलात्कार करून हत्या झाली असल्याचा आरोप त्यांनी याचिकेद्वारे केलाय. याप्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरदेखील गंभीर आरोप झाले. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणि किशोरी पेडणेकरांनी आपल्यावर दबाव आणला होता, असेही दिशाच्या वडिलांनी म्हटलंय. यावर आता किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
दिशा सालियान प्रकरणाशी माझा काही संबंध नाही; 5 वर्षांत तिच्या आईवडिलांना साक्षात्कार कसा झाला असा प्रश्न किशोरी पेडणेकर यांनी विचारला. पाच वर्षांपूर्वी मुलीने आत्महत्या केली असं सांगणारे दिशाचे आई वडील आतां का बदलले? हा तपासाचा विषय असल्याचेही त्या म्हणाल्या.
घटना घडली तेव्हा सगळ्या यंत्रणा तपास करत होत्या आणि जी सत्य घटना घडली त्याचे रिपोर्ट आले आहेत. ह्यांना जसे रिपोर्ट हवे आहेत तसें आले नाहीत आणि येणार नाहीत. 3 वर्षात सीडीआर रिपोर्ट अजून आला नाही मात्र या घटनेशी माझा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. 5 वर्षानंतर कसा काय साक्षात्कार झाला? यापूर्वी तीचे आईवडील सांगत होते मुलीने आत्महत्या केलीय आम्हाला त्रास देऊ नका, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.
सर्वांसमोर माझी सालियन कुटुंबासोबत भेट झाली होती. तेव्हासुद्धा त्यांनी आमची बदनामी थांबवा असं सांगितले होते. ती भेट केवळ प्रसंगिक होती. दिशा सालियनच्या पालकांसोबत मी उघड उघड चर्चा केली. त्यांची बायको वेगवेगळ्या चटण्या बनवते, यावरुन देखील दिशा सालियनच्या वडिलांसोबत चर्चा झाली, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकामागोमाग एक असे आरोप केले जात आहेत. दिशा सालियनच्या वडिलांनी महापौर बंगल्यावर येऊन मला विनंती केली होती. तिच्या वडिलांनी लेखी दिलं होतंय अनेकदा मला फोनही आले होते, अशी माहिती किशोरी पेडणेकरांनी दिली.कोणताही अपघात झाला तरी मी त्यांच्या घरी जाते. तशीच मी सालियन कुटुंबाला भेटायला गेली होती. ते माझ्यावर आरोप करत असतील तर ते सिद्धपण करतील, असेही त्या म्हणाल्या.
आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी होत असेल तर अनिल परब यांनी ज्यांची नाव घेतली आहेत त्यांचेपण राजीनामे घ्या. आरोप झाल्याबरोबर राजीनामा घ्यायला तुम्ही आदित्य ठाकरेंना निवडून आणलात का? त्यांना जनतेने निवडून दिलंय. आदित्य ठाकरे स्वच्छ चारित्र्याचे नेतृत्व आहेत. मी सामान्य जनतेतील किशोरी ताई असल्याचेही त्या म्हणाल्या.