कोकणात राजकीय भूकंप? मोठं नेतृत्व ठाकरेंची साथ सोडून BJP ऐवजी अजित पवारांच्या पक्षात?

Konkan Raigad Politics: भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा असतानाच आता अजित पवारांच्या पक्षात प्रवेश घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 22, 2025, 07:14 AM IST
कोकणात राजकीय भूकंप? मोठं नेतृत्व ठाकरेंची साथ सोडून BJP ऐवजी अजित पवारांच्या पक्षात?
अजित पवारांचा पक्ष ठाकरेंच्या सेनेला देणार धक्का

Konkan Raigad Politics: पालकमंत्री पदावरुन रायगडचं राजकारण तापलेलं असतानाच या ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनिल तटकरेंची कन्या अदिती तटकरे आणि भरत गोगावले या दोघांमध्ये चुरस दिसून येत आहे. असं असतानाच आता दोन्ही पक्षांनी शक्तीप्रदर्शनाबरोबरच आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केलेत. या प्रयत्नांमध्ये राष्ट्रवादीला एक मोठं यश मिळालं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देत लवकरच एक मोठा पक्षप्रवेश केला जाणार आहे.  

आज होणार अंतिम निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्‍हयात राष्‍ट्रवादी कॉंग्रेस शिवसेना ठाकरे गटाला धक्‍का देण्‍याच्‍या तयारीत आहे. ठाकरे गटाच्‍या महाडमधील विधानसभेच्‍या उमेदवार स्‍नेहल जगताप आता राष्‍ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्‍या वाटेवर आहेत. यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष सुनील तटकरे यांच्‍याशी स्‍नेहल जगताप यांचे काका हनुमंत जगताप तसेच प्रमुख पदाधिकारी आज सुतारवाडीत भेट घेवून अंतिम चर्चा करणार आहेत.

गोगावलेंना शह देण्यासाठी तटकरेंची खेळी?

स्‍वतः स्‍नेहल जगताप या चर्चेला उपस्थित राहणार नसल्‍याची माहिती सूत्रांची दिली आहे. रायगडच्‍या पालकमंत्री पदावरून सध्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू आहे. त्‍यामुळे भरत गोगावले यांना शह देण्‍यासाठी सुनील तटकरे यांनी ही खेळी खेळली असल्‍याची चर्चा सध्‍या रायगडच्‍या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मध्‍यंतरी स्‍नेहल जगताप यांचे भाजप प्रवेशासाठीदेखील प्रयत्‍न सुरू होते.

नक्की वाचा >> 'मुस्लिमांना जो डोळे दाखवणार त्याला सोडणार नाही', इफ्तार पार्टीत अजित पवारांचा शब्द; म्हणाले, 'कायदा आपल्या...'

कोण आहेत स्‍नेहल जगताप?

स्‍नेहल जगताप या काँग्रेसचे माजी दिवंगत आमदार माणिक जगताप यांच्‍या कन्‍या आहेत. महाड नगरपालिकेचे नगराध्‍यक्षपद त्‍यांनी भूषवले होते. दोन वर्षांपूर्वी स्नेहल यांनी शिवसेना ठा‍करे गटात प्रवेश केला. 2024 मध्ये स्‍नेहल यांनी भरत गोगावले यांच्‍या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी स्‍नेहल जगताप यांना मदत केल्‍याचा आरोप भरत गोगावले यांनी केला होता.

पालकमंत्रीपदावरुन वाद

महायुती सरकारने 18 जानेवारी रोजी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली. मात्र, पालकमंत्री पदाची यादी जाहीर होताच महायुतीत मोठ्या प्रमाणात धुसफूस सुरु झाल्याची चर्चा आहे. कारण पालकमंत्री पदाच्या यादीतून काही मंत्र्यांना डावलण्यात आलं आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि दादा भुसे यांचा समावेश आहे. मंत्री भरत गोगावले हे पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. तसेच आपण रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही असल्याचं त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं होतं. मात्र, पालकमंत्री पदाची यादीतून त्यांना डावलण्यात आलं. आदिती तटकरेंना पालकमंत्रिपदी नियुक्त करण्यात आला. मात्र नंतर या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली.