मुंबई : ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. सलग दुसऱ्या दिवशी गाड्या उशिरानं धावत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडण्यात येत असल्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. कोकणकन्या एक्स्प्रेस २ तास २९ मिनिटं उशिरानं धावते आहे. तुतारी एक्स्प्रेस २ तास ५ मिनिटं, पुणे-मडगाव ३ तास तर सावंतवाडी गणपती स्पेशल गाडी २ तास ४४ मिनिटं उशिरानं धावते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पनवेल सावंतवाडी गणपती स्पेशल ३ तास ५ मिनिटं, सीएसटी-सावंतवाडी गणपती स्पेशल १ तास तर कुर्ला-झाराप गणपती स्पेशल ४८ मिनिटं उशिरानं धावत आहे.


कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांचे हाल होत आहेत. मुंबई ते रायगड जिल्ह्यातल्या महाड या शंभर किलोमीटरच्या अंतरासाठी तब्बल २२ तासांचा वेळ लागला. शनिवारी रात्री मुंबईतून निघालेले अनेक गणेशभक्त रविवारी संध्याकाळपर्यंत महाड आणि माणगावच्या आसपासच अडकून होते. मुंबई - गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. 


पोलिसांनी वाहतुकीसाठी केलेलं नियोजन पूर्णपणे फसल्याचं दिसून आलं. कोकणात निघालेल्या लोकांना मुंबईतच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. शनिवारी रात्रीपासून चेंबूर ते वाशीनाका परिसरात तुफान वाहतूक कोंडी होती. पेण, नागोठणे परिसरातही अशीच स्थिती होती.