)
Konkan Travel News : कोकणात अशी असंख्य ठिकाण, अशा अनेक वळणवाटा आहेत ज्या प्रवासाची आवड असणाऱ्या प्रत्येकालाच खिळवून ठेवतात. इथं एकटे जा किंवा कोणासोबत.... या कोकणात अशी कैक ठिकाणं आहेत जिथं गेलं असता आपण जणू स्वत:चच वेगळं रुप पाहतोय याची अनुभूती होते. कोकण राकट आहे, कोकण मृदू आहे, कोकण मायाळू आणि तितकाच कणखरही आहे. अशाच कणखर कोकणाची साक्ष देणारं एक ठिकाण म्हणजे इथं चक्क एका बेटावर उभा असणारा भलाभक्कम किल्ला.
कोकणात असणाऱ्या या किल्ल्यानं कायमच पर्यटकांचं लक्ष वेधलं आणि काही कुतूहलपूर्ण प्रश्नांना वावही दिला. हा किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग. अरबी समुद्रात उभा असणारा हा एक ऐतिहासिक किल्ला असून, छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याची उभारणी इसवी सन 1664 मध्ये केली होती. या किल्ल्याचा मुख्य दरवाजा अशा रितीनं बांधण्यात आला, जिथून सुईचं टोकही आत शिरु शकत नव्हतं.
भारतात वाढणाऱ्या परदेशी अर्थात डच, पोर्तुगाली अशा व्यापाऱ्यांचा वावर आणि त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी या किल्ल्याची उभारणी करण्यात आली. हीरोजी होळकर यांच्या पाहणीखाली या किल्ल्यानं आकार घेतला. जाणून आश्चर्य वाटेल, पण हा किल्ला एका बेटावर उभा असून, त्याला खुर्ते या नावानंही ओळखतात. सुमारे 48 एकर भूखंडामध्ये हा किल्ला उभा असून, यामध्ये 30 फूट उंची आणि 12 फूट रुंदी असणाऱ्या भिंती आहेत, ज्यामुळं अरबी समुद्रातील लाटांपासून किल्ल्याचं रक्षण होतं. असं म्हणतात की, जवळपास 100 कुशल अभियंते आणि 3000 मजुरांच्या अथक परिश्रमांनी हा किल्ला उभारण्यात हातभार लावला, जो तीन वर्षांमध्ये पूर्ण झाला.
सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास काय?
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ते 1667 या काळात हा किल्ला बांधला, ज्याला 'समुद्र दुर्ग' म्हणतात. पोर्तुगीज, डच आणि सिद्दी व्यापाऱ्यांच्या वावराला आळा घालण्यासाठी हा नौसेना तटबंदी म्हणून उभारला गेला.
किल्ल्याची मुख्य वैशिष्ट्ये काय?
मालवण जवळील कुर्ते बेटावर (अरबी समुद्रात 1 किमी ऑफशोअर) 48 एकर क्षेत्रफळात पसरलेला. भिंती 30 फूट उंच आणि 12 फूट जाड, ज्या लाटांपासून संरक्षण देतात.
सिंधुदुर्ग किल्ला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ कधी?
ऑक्टोबर ते मार्च (नोव्हेंबर-फेब्रुवारी सर्वोत्तम). थंड हवामान, स्पष्ट आकाश, आणि फोटोग्राफी/फिरण्यासाठी उत्तम. उन्हाळ्यात (मार्च-मे) सकाळ-संध्याकाळी जा. मॉन्सून (जून-सप्टेंबर) टाळा – जोरदार पावसामुळे फेरी बंद आणि धोकादायक.