42 कोटींची स्टँम्प ड्युटी कोण भरणार? प्रश्न ऐकताच अजित पवार म्हणाले, 'अरे बाबा या...'

Pune Land Deal Parth Pawar Case: पार्थ यांचे वडील अजित पवार यांना जाहीर पत्रकार परिषदेमध्ये रद्द झालेल्या व्यवहाराचा संदर्भ देत 42 कोटींच्या थकित स्टँम्प ड्युटीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर अजित पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. ते काय म्हणाले पाहूयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 13, 2025, 08:05 AM IST
42 कोटींची स्टँम्प ड्युटी कोण भरणार? प्रश्न ऐकताच अजित पवार म्हणाले, 'अरे बाबा या...'
पुण्यात बोलताना अजित पवारांचं विधान

Pune Land Deal Parth Pawar Case: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांच्या मालकीच्या कंपनीच्या माध्यमातून झालेल्या जमीन व्यवहारावरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वात प्रथम 'झी 24 तास'ने प्रकाशझोतात आणलेल्या कोरगाव पार्क येथील सरकारी जमीन लाटण्याचा प्रकरणामध्ये आता व्यवहार रद्द झाला असला तरी 42 कोटी रुपयांच्या स्टँम्प ड्युटीची जोरदार चर्चा आहे. यासंदर्भात महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या विधानावरुन अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी खास आपल्या शैलीत या प्रश्नाला उत्तर दिल्याचं बुधवारी पुण्यात पाहायला मिळालं. 

Add Zee News as a Preferred Source

कुठे बोलत होते अजित पवार?

बालाजीनगरमधील एक रस्ता स्थानिक माजी नगरसेवक आप्पा रेणुसे यांनी दत्तक घेऊन त्याची दुरूस्ती तसंच शुभोभिकरण केलं असून पुणे मनपाच्या या रस्ता दत्तक योजनेचं उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण झालं. या कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांना 42 कोटींच्या स्टँम्प ड्युटीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.

नक्की वाचा >> भाकरी फिरली? दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीवर शिक्कमोर्तब? अजित पवार म्हणाले, 'माझं शरद पवार साहेबांशी...'

बानकुळे काय म्हणाले?

अजित पवारांना 42 कोटींच्या स्टँम्प ड्युटीसंदर्भात प्रश्न विचारताना बावनकुळेंनी केलेल्या विधानाचा संदर्भही पत्रकारांनी दिला. मुद्रांक शुल्क विभागानं पार्थ पवारांची अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांना 42 कोटी भरण्याची नोटीस बजावलीय. बावनकुळेंना मात्र ही नोटीस मान्य नाही. व्यवहार रद्द करण्यासाठी 42 कोटींची गरज नसल्याचं म्हटलं आहे. बावनकुळेंच्या याच विधानाचा संदर्भ देत अजित पवारांना प्रश्न करण्यात आला.

नक्की वाचा >> ₹500 च्या नोंदणीवरुन 300 कोटींची जमीन खरेदी करणारे पार्थ पवार किती श्रीमंत? जिजाई बंगला अन्...; संपत्तीचा तपशील समोर

अजित पवारांनी काय उत्तर दिलं?

42 कोटींची स्टँम्प ड्युटी कोण भरणार? असा प्रश्न अजित पवारांना विचारताना बावनकुळेंनी केलेल्या '42 कोटींचा दंड भरण्याची गरज नाही' या विधानाचा संदर्भ देण्यात आला.  हा प्रश्न ऐकताच अजित पवारांनी, "अरे बाबा या व्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाची समिती नियुक्त केली आहे. त्याचा अहवाल येऊ द्या, मग शासन ठरवेल याबाबत काय निर्णय घ्यायचा," असं उत्तर पत्रकारांना दिलं. एका महिन्यामध्ये या प्रकरणाशी संबंधित अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारने यापूर्वीच स्थापन केलेल्या समितीला दिले आहेत.

नक्की वाचा >> Chakankar V Thombre: दोघींमध्ये नेमका वाद काय? अजित पवार संतापले, एकीचं पद जाण्याइतकं घडलं काय? समजून घ्या

राजीनाम्याच्या मागणीवर काय म्हणाले अजित पवार?

अंजली दमानिया यांनी अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केल्याचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला असता उपमुख्यमंत्र्यांनी, "हे बघा कोणी काहीही मागणी करू देत. तो त्यांचा प्रश्न हे, पण माझ्या सद्सद् विवेकबुद्धीला जे पटेल तेच मी करेन," असं उत्तर दिलं. 

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More