Sanjay Raut Reaction: स्टॅण्डअप कॉमेडीयन कुणाल कामरा याने केलेली पॅरेडी वादात सापडली असून त्यावरुन आता राज्यातील राजकारण पेटले आहे. संतप्त शिवसैनिकांनी खार येथील युनी कॉन्टिनेंटल हॉटेलमधील 'द हॅबिटॅट क्लब'मध्ये राडा करत त्याची तोडफोड केली. तसेच कुणाल कामराला अटक करण्याची मागणी केली. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शहा यांनी देशाचं पोलीस स्टेट केलंय. म्हणजेच पोलिसांच्या दबावाखाली असलेले राज्य तयार केलंय. परंतु महाराष्ट्र याला अपवाद आहे. महाराष्ट्रात गुंडा राज्य असून संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका राऊतांनी केली. कुणाल कामरा याने राजकीय व्यंग टीका टिपण्या आमच्यावर देखील केल्या आहेत. 50 ते 60 लोक जातात आणि स्टुडिओ फोडतात. या महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभल्याचे हे लक्षण आहे. फडणवीस आणि महाराष्ट्राचा गृहमंत्री पद सोडावं, असं आवाहन संजय राऊतांनी केलं.एका ब्रॉडकास्टर स्टुडिओ उद्ध्वस्त केला पोलीस झोपा काढत होते का? महाराष्ट्रात आणीबाणी लावलेली आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
ज्याप्रमाणे नागपूरमध्ये दंगलखोरांकडून नुकसान भरपाई भरून घेणार असल्याचा फडणवीस म्हणतात. त्याचप्रमाणे या दंगलखोरांना तुम्ही सोडणार आहात की नाही? आणि त्यांचे नुकसान देणार की नाही? हा एक प्रश्न असल्याचे राऊत म्हणाले. महाराष्ट्राच्या राजधानी तुम्ही गुंडाराज चालवत आहात. या गाण्यांमध्ये कोणाचाही उल्लेख नसल्याचेही ते म्हणाले.कालच्या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे. हा संपूर्ण कट दीड दोन तास आधीच शिजला होता. काय करत होते मुंबई? पोलीस ज्या परिषदेच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडला त्या पोलीस स्टेशनमधले एसीपी आणि सीनियर यांच्यावर देखील कारवाई केली पाहिजे.कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत महाराष्ट्राची देशामध्ये अपप्रचार होत असल्याचे राऊत म्हणाले.
धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा. राजकारणातल्या लोकांनी आपल्यावरील व्यंगात्मक टीका सहन केले पाहिजे. फडणवीस यांना स्वतःची प्रतिष्ठा सांभाळायची असेल तर दंगलखोरांवर कारवाई केली पाहिजे. विधिमंडळ जे चालला आहे ते ब्रॉडकास्टपेक्षा भयंकर असल्याचेही ते म्हणाले. ज्यांनी काल हल्ला केला त्यांनी प्रशांत कोरटकर का नाही हल्ला केला? शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या प्रशांत कोरटकरवर कारवाई करा. मग महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील, असे राऊत म्हणाले. अख्खं सभागृह खोक्याने भरलं आहे की नाही या राज ठाकरेंच्या मताशी असहमत आहे. पण राज ठाकरे जे बोलत आहेत हे विधान गांभीर्याने घेतले पाहिजे. त्यांनी सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवले आहे. असे खोके भाई असल्यामुळे ते निवडणुकीत सहज जिंकून येतात, असेही राऊत म्हणाले.
नागपूरात दंगल दोन्ही बाजूंनी घडली आहे. दंगलीची सुरुवात ज्याने केली ते तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत. औरंगजेब कबरिचा मुद्दा कोणी काढला ते तुमच्या मंत्रिमंडळातच आहेत. कोकणात बुलडोझर चालवाल का? पुण्यात बुलडोजर पाठवाल का? तुमच्या लोकांनी अशी वक्तव्य केल्यामुळे ही चालना मिळाली असल्याचे राऊत म्हणाले. सर्वांवर समान कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कुणाल कामरावर गुन्हा का दाखल करावा? मग नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यावरती रोज गुन्हे दाखल होतील. एकनाथ शिंदे यांच्या विधान परिषदेतील भाषणावर देखील गुन्हा दाखल होईल, असे राऊत म्हणाले.