Kunal Kamra Controversy: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपहासात्मक गाणं रचल्यामुळं महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामराच्या स्टँडअपनंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी खार येथील स्टुडिओची तोडफोड केली आहे. हॅबिटेड हॉटेलमध्ये कुणाल कामरा याचा शो होता. शोनंतर या हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली आहे. त्यानंतर हॉटेलकडून या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया आली आहे. हॉटेलने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली आहे. तसंच, कुणाल कामराच्या वक्तव्याशी आमचा काहीही संबंध नसून आम्ही त्यास दुजोरा देत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच, या शोनंतर हॉटेलच्या अनिधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे.
कुणाल कामरा यांने शोमध्ये उपमुख्यमंत्री यांच्या उपहासात्मक गीत रचले होते. यात त्याने शिवसेनेतील फुट आणि शिवसेना-भाजप युती याबाबत गाण्यात उल्लेख केला आहे. कुणालच्या शोनंतर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर शिवसैनिकांनी हॉटेलची तोडफोड केली आहे. दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी कुणाल कामरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सगळ्या प्रकरणावर ज्या हॉटेलमध्ये तोडफोड करण्यात आली. त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्या हॉटेलवर करण्यात आलेल्या तोडफोडीनंतर आम्हाला धक्का बसला असून अत्यंत दुःख होतंय. कलाकार हे त्यांच्या कलात्मक रचनेच्या निवडीसाठी आणि विचारांसाठी स्वतः जबाबदार असतात. कोणत्याही कलाकाराने सादर केलेल्या परफॉर्मन्ससाठी आम्ही कधीधी सहभागी झालो नाही. परंतु, कालच्या घटनांचा आम्हाला पुन्हा विचार करायला भाग पाडले आहे. जेव्हा एखादा कलाकार मर्यादा ओलांडतो तेव्हा आम्हाला दोषी कसे काय ठरवले जाते? असा सवाल त्यांनी केला आहे.
आमच्या माध्यमातून चांगला आणि हितकारक कंटेट सादर केला जावा यासाठी आम्ही अभिव्यक्ती, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही किंवा अपमान केला जाणार नाही, असे कंटेट व त्यांचे संतुलन कसे साधायचे याचा मार्ग शोधून काढेपर्यंत कार्यक्रम बंद ठेवत आहोत, असं हॉटेल प्रशासनाने म्हटलं आहे.
आम्ही सर्व कलाकार, प्रेक्षक आणि भागधारकांना चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे विचार व मार्गदर्शन जाणून घेऊ. जेणेकरुन आम्ही कलाकारांच्या अधिकारांचादेखील आदर करू शकू, असं हॅबिटेड हॉटेलने म्हटलं आहे.
तसंच, आणखी एक पोस्ट करत हॅबिटेड हॉटेलने या प्रकरणानंतर दिलगिरी व्यक्त केली आहे. कुणाल कामराचा अलीकडे प्रसारित झालेल्या व्हिडिओत हॅबिटेडचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नसून त्याने व्यक्त केलेल्या मतांना आम्ही दुजोरा देत नाही. या व्हिडिओमुळं ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत त्या सर्वांची आम्ही मनापासून माफी मागतो, असं हॅबिटेड हॉटेलने म्हटलं आहे.
दरम्यान, द हॅबीटॅट स्टुडीओच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई केली आहे. मुख्य बांधकामाला लागुन उभारण्यात आलेले शेड तोडण्यात आले आहेत.