3 महिन्यात फक्त 98 कुणबी प्रमाणपत्र, हैद्राबाद गॅझेटच्या निर्णयाचा फायदा होतोय की नाही?

Manoj Jarnge Patil: गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यातील केवळ 98 जणांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 12, 2025, 10:14 PM IST
3 महिन्यात फक्त 98 कुणबी प्रमाणपत्र, हैद्राबाद गॅझेटच्या निर्णयाचा फायदा होतोय की नाही?
Kunbi certificate issued to only 98 Marathas in three months maratha reservation

Manoj Jarnge Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर २ सप्टेंबर रोजी निघालेल्या हैदराबाद गॅझेटियर जीआरनुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात तीन महिन्यांमध्ये मराठा समाजाला केवळ 98 कुणबी ओबीसी प्रमाणपत्रे मिळाली आहेत. त्यामुळं अवघी मुंबई जॅम करीत जरांगेंनी हैद्राबाद गॅजेटसाठी केली धडपड व्यर्थ गेली का असा प्रश्न उपस्थित होतोय.

Add Zee News as a Preferred Source

अवघ्या महाराष्ट्राने ७ दिवस मुंबईत धडकलेल्या जरांगेंच्या आंदोलनाचा झंझावात बघितला. त्यानंतर हैद्राबाद गॅझेटची मागणी मान्य करत सरकारला जीआर काढावा लागला. त्यानंतर मराठा आंदोलकांनी आंदोलन मागे घेत एकच जल्लोष केला. कुणबी नोंदींचा मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी भावना तयार झाली. पण गेल्या ३ महिन्यात फक्त 98 जणांनाच या गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळू शकलंय.

मराठवाड्यात किती कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप?

कुणबी प्रमाणपत्रासाठी एकूण 594 अर्ज

परभणी जिल्ह्यातून सर्वाधिक 445 अर्ज, 47 जणांना प्रमाणपत्र

संभाजीनगर जिल्ह्यातून 14 अर्ज, एकालाही प्रमाणपत्र नाही

जालना जिल्ह्यातून 78 अर्ज, 8 जणांना प्रमाणपत्र

बीड जिल्ह्यातून 22 अर्ज, सर्वांना प्रमाणपत्र वाटप

धाराशिव जिल्ह्यातून 13 अर्ज, 4 जणांना प्रमाणपत्र

लातूर जिल्ह्यातून 12 अर्ज, 9 जणांना प्रमाणपत्र

नांदेड जिल्ह्यातून 5 अर्ज, सर्वांना प्रमाणपत्र वाटप

हिंगोली जिल्ह्यातून 5 अर्ज, 3 जणांना प्रमाणपत्र

मराठवाड्यातील मराठा समाजाला सरकारच्या निर्णयाचा मोठा फायदा होईल असं म्हटलं जात असतानाच ही आकडेवारी मात्र त्याला छेद देतेय. यावरुनच जरांगेंनी सरकारवर निशाणा साधलाय. तर यात नेमक्या काय अडचणी आहे ते आम्ही समजून घेऊ असं विखेंनी म्हटलंय.

पण संथगतीने सुरु असलेल्या प्रमाणपत्र वाटपावरुन काँग्रेस नेत्यांनीही नाराजी व्यक्त केलीये. तर प्रसाद लाड यांनी मात्र कोणावरही अन्याय होणार नाही असं म्हटलंय. सरकारने पुन्हा एकदा प्रमाणपत्र वाटपावरुन आश्वस्त केलंय. पण मुळात अर्जांचं प्रमाण देखील लक्षणीयरित्या कमी आहे. त्यामुळे आता सरकारकडून आणखी काही पावलं उचलली जाताता का आणि त्याचा सकारात्मक परिणाम अर्ज आणि प्रमाणपत्र वाटपावर होतो का हे पाहावं लागेल. 

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More