)
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी जरांगेंच्या नेतृत्वात मुंबईत मोठं आंदोलन झालं. त्यानंतर हैदराबाद गॅझेटनुसार जीआर निघाला. मात्र आता त्यालाच विरोध करण्यासाठी कुणबी समाजानं मुंबईत ठाण मांडलं आहे. कुणबी समाजोन्नती संघानं आझाद मैदानावर आंदोलन केलं आहे.
मराठ्यांनंतर आता कुणबी समाजानं चलो मुंबईचा नारा दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून कुणबी समाजानं ओबीसी एल्गार मोर्चाचं नियोजन केलं आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर कुणबी समाजाकडून मोठं शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नका, ही प्रमुख मागणी आहे. या पार्श्वभूमीवर कुणबी समाजोन्नती संघाचे शेकडो कार्यकर्ते आझाद मैदानावर दाखल झालेत. त्यांच्या डोक्यावर जय कुणबी लिहिलेल्या गांधी टोप्या आणि हातात निषेधाचे फलक पाहायला मिळाले. मराठा आरक्षणानंतर ओबीसी समाजाच्या या एल्गार मोर्चामुळे आरक्षणाचा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
- मराठा समाज ओबीसीत समाविष्ट होऊ नये यासाठी सरकारनं शोधलेल्या 58 लाख मराठा-कुणबी नोंदी तत्काळ रद्द कराव्यात
- मराठा-कुणबी नोंदी तपासण्यासाठी स्थापन केलेली शिंदे समिती त्वरित बरखास्त करावी
- ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी तत्काळ करून राज्य सरकारच्या नोकऱ्यांमधील अनुशेष त्वरित भरण्यात यावा
- जात आधारित जनगणना करून जात दाखले आधार कार्डशी लिंक करावेत
- सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि दोन समित्यांच्या शिफारसी त्वरित अमलात आणाव्यात
या आंदोलनाच्या माध्यमातून कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. सरकारनं आमच्या आरक्षणाच्या मुद्द्याकडे तातडीनं लक्ष देऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आजचा हा मोर्चा भविष्यात अधिक उग्र आंदोलनाचं रूप घेईल, असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या नोंदींवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, या मोर्चानं राज्यातील आरक्षणाचं राजकारण निर्णायक वळणावर येऊन ठेपलंय, हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे मराठ्यांनंतर आता कुणबी समाजाची समजूत काढण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.