दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराच्या ट्रस्टने मोठा निर्णय घेतला आहे. कुणकेश्वर मंदिर ट्रस्टने मंदिरात प्रवेश करणाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भक्तांना या ड्रेसकोडचं पालन करावं लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, जे भक्त ड्रेसकोडचं पालन करणार नाहीत त्यांना ट्रस्टकडून वस्त्रं दिली जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुणकेश्वर मंदिरात यापुढे अंगप्रदर्शन करणारे कपडे, नवीन फॅशननुसार तोकडे व उत्तेजक वस्त्रे घालणाऱ्यांना थेट प्रवेश मिळणार नाही. अशा भाविकांना देवस्थानकडून शाल, उपरणे, पंचा, ओढणी दिली जाणार आहेत अशी माहिती कुणकेश्वर देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.


कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "श्रावणी सोमवारच्या निमित्ताने कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. भाविकांना आमचं विनम्र आवाहन आहे की, त्यांनी देवस्थानला सहकार्य करत वस्त्रसंहितेचं पालन करावं. जेणेकरुन देवस्थान प्रशासनाला त्रास होणार नाही". 


पुढे त्यांनी सांगितलं आहे की, "मंदिरात येणाऱ्या भाविकांनी फाटलेल्या जीन्स किंवा उत्तेजक कपडे परिधान करु नयेत. त्यांनी आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे. येणाऱ्या भाविकांनी हिंदू धर्माचं पालन करत मंदिराचं पावित्र्य राखावं यासाठी हा निर्णय घेतला आहे. ज्या भाविकांना या निर्णयाची माहिती नसेल त्यांना सुविधा देण्यात आली आहे. देवस्थान त्यांना शाल, उपरणा अशा गोष्टी उपलब्ध करुन देणार आहे. जेणेकरुन त्यांना दर्शनाविना मागे फिरावं लागणार नाही. सर्व भाविकांनी देवस्थानला सहकार्य करावं अशी आशा आहे".