Kurla BEST Bus Accident: चालकाला फक्त 10 दिवसांचा अनुभव, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर
Kurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघाताप्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आहे. बस चालकाबाबत आता मोठी माहिती समोर येत आहे.
सीमा आढे, झी मीडिया
Kurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघाताप्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. कुर्ला एलबीएस मार्गावर झालेल्या अपघातात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू तर 49 जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसंच, बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून पुढील चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणात बस चालकाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बेस्ट बस रूट क्र.332 कुर्ला स्थानक येथून या अंधेरीकडे जात असताना हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही जणांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला आहे. तर, बेस्ट बस मार्केटमध्ये भरधाव वेगाने शिरल्याने अनेकांना धडक दिली. घटनास्थळाचा फॉरेन्सिक टीमकडून पंचनामा करण्यात आला आहे. या दरम्यान बस चालकाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
चालकाला अनुभवच नव्हता...
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील चालक संजय मोरे हा 1 डिसेंबर रोजी चालक म्हणून रुजू झाल्याची माहिती समोर येत आहे. चालकाचे वय 54 वर्ष असून तो याआधी अन्य ठिकाणी कामाला होता. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत बस चालकाने या आधी कुठलेही मोठे वाहन चालवले नसल्याचे समोर आलं आहे. बस चालक संजय मोरेवर सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना महापालिकेच्या भाभा रुग्णालय आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचे सीसीटिव्ही फुटेजदेखील व्हायरल झाले आहे. यात स्टॉपवर नागरिक उभे असताना अचानक एक भरधाव बस जाताना दिसते. या बसच्या पुढे असलेल्या एका रिक्षाला धडक देऊन तिला फरफटत नेताना दिसत आहे. या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
काय घडलं नेमकं?
सोमवारी रात्री 8.30 च्या सुमारास कुर्ला परिसरातील गजबजलेल्या लालबहादुर शास्त्री मार्गावर हा अपघात घडला. गर्दीच्या ठिकाणी अचानक भरधाव वेगात बस शिरली आणि त्यामुळं अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा ब्रेक फेल झाल्याचं सांगितलं जातं. तर, काही जण चालकाची चुकी असल्याचं म्हणत आहे. मात्र, अद्याप काहीच ठोस माहिती समोर आली नाही.