Kurla BEST Bus Accident: मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या 'बेस्ट' बसच्या अपघातामध्ये मृतांची संख्या वाढली आहे. सोमवारी रात्री या अपघातामध्ये तीन जण दगावल्याची माहिती समोर आली होती. मात्र उपचारादरम्यान तीन जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा सहा वर पोहोचला आहे. या अपघातामध्ये 49 जण जखमी झाले आहेत. नियंत्रण सुटलेल्या बसने अनेक पादचाऱ्यांबरोबरच वाहनांनाही धडक दिल्याचं पाहायला मिळालं. एस. जी. बर्वे मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


पिलरला धडकली वाहने


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बृहृन्मुंबई इलेक्ट्रीसिटी सप्लाय अॅण्ड ट्रान्सपोर्ट म्हणजेच 'बेस्ट'ची अपघातग्रस्त बस कर्ल्यावरुन अंधेरीला जात असतानाच हा अपघात कुर्ला पश्चिम येथे घडला. या भरधाव वेगातील बसने 30 ते 40 वाहनांना घडक दिली. काही वाहने अगदी 100 मीटरपर्यंत फरफटत नेली. ही बस इतकी वेगात होती की तिने धडक दिलेल्या गाड्या रस्त्याच्या बाजूला काम सुरु असलेल्या बांधकाम सुरु असलेल्या पिलरवर आदळून अगदी चक्काचूर झाल्या. या इमारतीची सुरक्षा भिंत तोडून धडक बसलेली वाहनं त्याखाली दबली गेली. 


पोलिसांनी काय सांगितलं?


"कुर्ल्यामध्ये बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने काही वाहने चिरडली. 25 लोक यामध्ये जखमी झाले असून मृतांची संख्या 4 वर पोहोचली आहे. जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणामध्ये बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास आम्ही करत आहोत," अशी माहिती झोन 5 चे उपायुक्त गणेश गावडे यांनी रात्री उशीरा प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. जखमींना महानगरपालिकेच्या भाभा रुग्णालयाबरोबरच सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भाभा रुग्णालयातील डॉक्टर पद्मश्री आहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यापैकी दोघांना दाखल केलं तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मंगळवारी सकाळी मृतांची तसेच जखमींची संख्या अधिक असल्याची माहिती समोर आली असून शेवटची माहिती हाती आली तेव्हा मृतांची संख्या 6 वर पोहचली असून जखमींची संख्या 49 वर पोहचली आहे.


सखोल चौकशीची मागणी


बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. बेस्टच्या मार्ग क्रमांक 332 वरील ही बस होती.  प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या, माहितीनुसार काही जणांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. कुर्ल्यातील बेस्ट बसच्या अपघातासंदर्भात बोलताना काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी दुख: व्यक्त केलं आहे. आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करताना वर्षा गायकवाड यांनी 'ही दुर्घटना धक्कादायक आणि चिंताजनक असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी केली. रात्री पाऊणे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. रस्त्यावरील गोंधळाचे अनेक व्हिडीओ सध्या समोर आले आहेत.