'लाडक्या बहिणीं'ना पैसे देण्यासाठी ₹4100000000 चा निधी वळवला; कोणाला बसणार फटका?

Ladki Bahin Yojana: महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर 2025 च्या हप्त्यासाठी तयारी सुरु झालीय. 

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 9, 2025, 02:14 PM IST
'लाडक्या बहिणीं'ना पैसे देण्यासाठी ₹4100000000 चा निधी वळवला; कोणाला बसणार फटका?
लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसंदर्भातील मोठी बातमी समोर आलीय. लाडकी बहीण योजना चालवणे राज्य सरकारसाठी डोईजड जातेय का? असा प्रश्न उभा पाहतोय. यामागे कारणही तसंच आहे. लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्याचा प्रकार समोर आला होता. यावर संजय शिरसाट यांनी नाराजीदेखील व्यक्त केली होती. असा प्रकार पुन्हा घडल्याचे पाहायला मिळतंय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर 2025 च्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी आर्थिक ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, या विभागाला आपल्या योजनांसाठी निधी वापरताना काटकसर करावी लागेल. सरकारने यासंदर्भात बुधवारी शासन निर्णय जाहीर करून लाडकी बहीण योजनेसाठी 3960 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर परिणाम

सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेसारख्या योजनांचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, याची खबरदारी प्रशासन घेणार आहे. उपलब्ध निधी केवळ या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठीच वापरला जाईल, अशी सूचना महिला व बालकल्याण खात्याने दिली आहे.

लाडकी बहीण योजनेची सद्यस्थिती काय?

जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजने अंतर्गत ऑगस्ट 2025 पर्यंत लाभार्थ्यांना 14 हप्त्यांचे वितरण झाले आहे. सप्टेंबरच्या हप्त्यासाठी निधी वळवल्यानंतर लवकरच 1500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

लाभार्थ्यांची संख्या घटणार 

लाडकी बहीण योजनेसाठी कठोर निकष लागू करण्यात आल्याने पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होत आहे. ई-केवायसी प्रक्रियेद्वारे कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे. यासाठी लाभार्थी महिलांच्या वडील आणि पती यांच्या उत्पन्नाची पडताळणी सुरु आहे.

आर्थिक नियोजनावर प्रश्नचिन्ह

सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याने या विभागाच्या योजनांवर परिणाम होऊ शकतो. सरकारला आता योजनांचे आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करावे लागेल, जेणेकरून सामाजिक न्याय आणि लाडकी बहीण योजना यांचा समतोल राखला जाईल.

FAQ 

प्रश्न: लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर 2025 च्या हप्त्यासाठी कोणत्या विभागाचा निधी वळवण्यात आला आहे?

उत्तर: लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर 2025 च्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला आहे. यामुळे सामाजिक न्याय विभागाच्या योजनांसाठी निधीची कमतरता निर्माण होऊ शकते, आणि त्यांना आर्थिक नियोजनात काटकसर करावी लागेल.

प्रश्न: सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्या योजनांवरील लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही?

उत्तर: सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. विशेषतः अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ही खबरदारी घेतली जाईल, अशी सूचना महिला व बालकल्याण खात्याने दिली आहे.

प्रश्न: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या का कमी होत आहे?

उत्तर: सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी कठोर निकष लागू केले असून, ई-केवायसी प्रक्रियेद्वारे लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न तपासले जात आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्या महिलाच पात्र ठरतात. यासाठी लाभार्थींच्या वडील आणि पती यांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात असल्याने लाभार्थ्यांची संख्या कमी होत आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More