Ladki Bahin: संक्रांतीच्याआधी की नंतर? लाडक्या बहिणींना 3 हजार कधी मिळणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ladki Bahin Yojana:  सध्या डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 च्या दोन हप्त्यांसाठी 3000 रुपयांची चर्चा सुरू आहे.

प्रविण दाभोळकर | Updated: Jan 13, 2026, 06:41 AM IST
Ladki Bahin: संक्रांतीच्याआधी की नंतर? लाडक्या बहिणींना 3 हजार कधी मिळणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
लाडकी बहीण

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही महिलांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवता येतात आणि आर्थिक स्वावलंबन वाढते. ही योजना 2024 पासून सुरू झाली असून, लाखो महिलांना लाभ मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील अर्थ विभागाने ही योजना प्रभावीपणे राबवली. योजनेचा मुख्य हेतू महिलांना सशक्त करणे आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेला हातभार लावणे हा आहे. सध्या डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026 च्या दोन हप्त्यांसाठी 3000 रुपयांची चर्चा सुरू आहे, जी मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने महिलांना विशेष भेट म्हणून दिली जाणार होती. त्याचं पुढे काय झालं? सविस्तर जाणून घेऊया 

Add Zee News as a Preferred Source

3 हजारच्या हफ्त्याची घोषणा

गिरीश महाजन यांनी सोशल मीडियावर 7 जानेवारी 2026 रोजी महत्वाची घोषणा केली. पात्र बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित 3000 रुपये 14 जानेवारीला बँक खात्यात जमा होतील. सण-उत्सवात महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून ही रक्कम मकर संक्रांतीच्या आधी देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आल्याचेही महाजन म्हणाले. ही भेट 'लाडक्या बहिणीं'साठी विशेष असल्याचे म्हटले गेले. मात्र ही तारीख 15 जानेवारीला होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या एक दिवस आधी असल्याने वाद निर्माण झाला. सरकारचा हेतू महिलांना सणाच्या आधी मदत देण्याचा असला तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल राजकीय फायद्यासाठी असल्याचे आरोप झाले.

काय म्हणाले अजित पवार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच निर्णय घेतला जाईल. जर आयोगाने हप्ता स्थगित करण्यास सांगितले तर तो नंतर देण्यात येईल; अन्यथा 14 जानेवारीलाच रक्कम जमा होईल, असे अजित पवार म्हणाले. 'ही योजना सरकारचा नियमित कार्यक्रम आहे आणि निवडणुकीच्या आचारसंहितेशी त्याचा संबंध नाही. कोणत्याही परिस्थितीत लाभ मिळेल आणि कोणाचीही रक्कम कापली जाणार नाही', असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने महिलांमध्ये विश्वास निर्माण झालाय. पण ही राजकीय खेळी असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

निवडणूक आयोगाची भूमिका

राज्य निवडणूक आयोगाने (एसईसी) या घोषणेवरून मुख्य सचिवांकडून अहवाल मागितला आहे. काँग्रेसच्या तक्रारीनंतर 12 जानेवारीला आयोगाने पत्र पाठवले आणि 13 जानेवारी सकाळी 11 वाजेपर्यंत स्पष्टीकरण मागितले. , निवडणुकीच्या एक दिवस आधी हप्ता देणे हे मतदारांना प्रभावित करण्यासारखे असू शकते, जे आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असे आयोगाचे म्हणणे आहे. आयोगाने अॅडव्हान्स पेमेंट रोखण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे 3000 रुपयांची रक्कम संक्रांती आधी मिळेल की नंतर, याबाबत अनिश्चितता आहे. यावर आयोगाचा निर्णय अंतिम असणार आहे.

विरोधकांकडून टीका

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी या घोषणेवर तीव्र टीका केली आहे. दोन महिन्यांचा हप्ता निवडणुकीच्या आधी देणे हे मतदारांना लालच देण्यासारख्या आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकळ यांनी दिली. साचिन सावंत यांनी सरकारला 'स्वार्थी भाऊ' म्हटले. दोन महिने हप्ता थांबवून निवडणुकीत 'रिटर्न गिफ्ट' म्हणून देणे हे भावनिक नसून राजकीय असल्याचेही ते म्हणाले. महायुती सरकार निवडणुकीत फायदा घेण्यासाठी योजनेचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. 

कधी मिळेल?

या वादामुळे महिलांना 3000 रुपयांची रक्कम संक्रांती आधी मिळेल की निवडणुकीनंतर हे आयोगाच्या निर्णयावर अवलंबून आहे. निर्णय स्थगित झाला तर हफ्ता फेब्रुवारीत मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान महिलांनी बँक खाते अपडेट ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More