कोरोनाची धास्ती : हरभरा शेतकऱ्यावर आली 'ही' वेळ

 दीड हजाराच्या फरकाने आपला हरभरा व्यापाऱ्यांना विकावा लागतोय. 

Updated: Mar 19, 2020, 07:08 AM IST
कोरोनाची धास्ती : हरभरा शेतकऱ्यावर आली 'ही' वेळ

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : राज्य सरकारने हरभऱ्याला ४८५० रुपयांचा हमीभाव जाहीर करून जवळपास दोन महिने उलटून गेली. मात्र अद्याप हरभऱ्याचे खरेदी केंद्र सुरु न झाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक ते दीड हजाराच्या फरकाने आपला हरभरा व्यापाऱ्यांना विकावा लागतोय. त्यात कोरोनाच्या धास्तीने मार्केट बंद होण्याच्या भीतीमुळे कमी किंमतीत शेतकरी हरभरा विकत असल्याचे वास्तव लातूरमध्ये दिसून येत आहे. 

लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील कारला या गावातील हे आहेत शेतकरी राम गोविंदराव काळे. ५५ वर्षीय काळे यांनी ६ एकर मध्ये हरभरा पिकवला. त्यातून जवळपास ५० कट्टे इतकं हरभऱ्याचे उत्पादन झाले. डिसेंबर महिन्यात शासनानं हरभऱ्याला ४७७५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला. फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन नोंदणीहि सुरु केली. मात्र प्रत्यक्षात लातूर जिल्ह्यात एकही खरेदी केंद्र सुरु झालेलं नाही. त्यात कोरोनाचे संकट उभं असल्यामुळे प्रत्यक्षात खरेदी केंद्र सुरु होतील कि नाही या भीतीने राम काळे यांनी ३७०० रुपये क्विंटल प्रमाणे आपला हरभरा व्यापाऱ्याला विकला. त्यामुळे सरकारच्या हमीभावापेक्षा तब्बल १०७५ रुपये कमी भाव राम काळे यांना भेटला. कोरोनाचे सावट घोंगावत असल्यामुळे कधीही मार्केट ठप्प होईल या भीतीने कमी भावाने का होईना हरभरा विकल्याचे ते सांगतात. त्यांच्याप्रमाणेच इतरही अनेक शेतकरी आहेत ज्यांनी कमी भावाने नाईलाजास्तव हरभरा विकावा लागला. 

६ एकरमध्ये हरभरा लावला. ५० कट्टे हरभरा. ऑनलाईन नोंदणी केली . पण कोरोनामुळे कमी भावात विकावा लागतोय. त्यात खरेदी केंद्र सुरु नाहीत. अजून ऑनलाईन नोंदणीचा सुरु आहे. शासनाची खरेदी केंद्र सुरु करण्याची चिन्ह नाहीत. खरेदी केंद्र बंद होतील. पण खरेदी केंद्र सुरु करावी. नुकसान होत असल्याचे शेतकरी राम काळे सांगतात. 

शेतकऱ्यांचे नुकसान आहे. बाजार बंद होण्याची भीती. कोरोनामुळे बाजार चालू होईल कि नाही याबाबत संभ्रम. खरेदी केंद्र सुरु व्हायला पाहिजेत. शासनाचा धीमा कारभार. मोठ्या लोकांचा माल जाईल. याचा फटका छोट्या शेतकऱ्यांना बसणार असल्याचे संभाजी मुमाणे या शेतकऱ्याने सांगितले.

४ एकर मध्ये २० कट्टे निघाले. ऑनलाईनला नंबर न लागल्यामुळे इकडे घालत आहे. तूर पण अशीच विकली. कोरोनामुळे मार्केट बंद होईल असे वाटत असल्याचे शिवाजी काळे या शेतकऱ्याने सांगितले. 

मुळात सरकारची शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्याची इच्छाच नसल्यामुळे अद्यापपर्यंत फेडरेशनने खरेदी केंद्र सुरु न केल्याचा शेतकरी संघटनेने केलाय. जर शासनाला खरंच शेतकऱ्यांची चिंता असेल तर शेतकऱ्यांना हमीभावाच्या फरकाची रक्कम अदा करावी अशी मागणीही शेतकरी संघटनेने लावून धरली आहे. दरम्यान खरेदी  केंद्रात हरभरा विक्री व्हावा यासाठी आतापर्यंत १३हजार ४१२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. मात्र शासनाचे आदेश न आल्यामुळे अद्याप खरेदी सुरु झाली नसल्याचे फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

फरकाची रक्कम द्यावी अन्यथा आंदोलन करणार असल्याचे लातूर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुर यांनी सांगितले. हरभरा संपत आला की खरेदी केंद्र सुरु करतील असा टोला त्यांनी लगावला. वराती मागून घोडे असा प्रकार सरकारचा सुरु आहे. खरेदी केंद्र सुरु सरकारचे नाटक बंद करावं. तूर हरभरा मध्ये एक हजाराचा घाटा. फरकाची रक्कम भरून घाटा भरून काढावा. पालकमंत्र्यांचे लक्ष नसल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्रातील मोठ्या बाजारपेठांपैकी तसेच तूर आणि हरभऱ्याचे आगार असलेल्या लातूर जिल्ह्यात अद्यापपर्यंत हरभरा खरेदी केंद्र सुरु न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यात आता कोरोनाचे संकट असल्यामुळे खरेदी केंद्र सुरूच होतील कि नाही अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने याबाबत शेतकरी हित पाहून तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.