बोगद्यामध्ये पाणी साचल्याने बंद असलेली कोकण रेल्वे पूर्ववत
गेल्या काही काळापासून बोगद्यामध्ये पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या कारणावरून कोकण रेल्वेचा मार्ग बंद होता. दरम्यान कोकण रेल्वेच्या पेडणे येथील बोगद्यातील वाहतूक पूर्ववत झाली आहे. पाहिली ट्रेन पेडणे बोगद्यातून 22: 34ला रवाना झाली आहे. विविध स्थानकात थांबवून ठेवलेल्या सर्व ट्रेन रवाना झाल्याची माहिती कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.
10 Jul 2024, 09:03 वाजता
आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी- मुख्यमंत्री
आरक्षणाबाबत आपली भूमिका लेखी कळवावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय पक्षांना केले आहे. राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
10 Jul 2024, 08:16 वाजता
बिबट, चिंकरा प्राण्याचे अवयव जप्त
काटोल वनपरिक्षेत्र पथकाने वन्य प्राण्यांचे अवयव जप्त केलेत.बिबट्याची कवटी,15 नख, बिबट्याचा मिश्या, चिंकाराची पाच शिंग जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून श्रीकांत किसन दुपारे असे त्याचे नाव आहे. आरोपीच्याच्या घरातून अवयवासह शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याला 5 दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
10 Jul 2024, 07:35 वाजता
हिंगोली, परभणीत भूकंपाचे सौम्य धक्के
हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून जमिनीतून गूढ आवाज येतोय. आज सकाळी 7 वाजून 14 मिनिटांना भुगर्भातून आवाज आला. जिल्ह्यातील अनेक गावात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला
10 Jul 2024, 07:22 वाजता
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूरकडे मार्गस्थ
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा निमगाव केतकी इथला पाहुणचार घेऊन इंदापूरकडे मार्गस्थ झाला. आज इंदापुरात तुकोबारायांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडणार आहे. गोल रिंगणाचा हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी इंदापुरात जमणार आहेत. गोल रिंगण पार पडल्यानंतर आज इंदापूर इथंच तुकोबांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे तर, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटणकरांचा निरोप घेऊन पुढे मार्गस्थ झाली आहे. पिंपळद येथे दुपारचा विसावा घेऊन माऊलींची पालखी बरड इथे दाखल होईल. आज बरड इथं माऊलींच्या पालखीचा मुक्काम असेल.
10 Jul 2024, 07:14 वाजता
नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी गंगाधर अखेर लातुरच्या न्यायालयात हजर
गेल्या अनेक दिवसांपासून गुंगारा देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी गंगाधारच्या मुसक्या आवळण्यात अखेर CBI ला यश आलंय. आंध्र प्रदेशातून बंगळूरच्या CBI पथकाने गंगाधरला अटक केली आहे. गंगाधरला लातुरच्या न्यायालयात CBI ने हजर केले असता न्यायालयाने गंगाधर ला दोन दिवसांची CBI कोठडी देण्याचे आदेश दिलेत.