22 Dec 2023, 21:55 वाजता
मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी
Mumbai Artificial Rain : मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सहा कंपन्यांनी तयारी दर्शवलीय.. प्रदूषणास कारणीभूत धुळीचे कण हवेत पसरु नये यासाठी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. यासाठी अनुभवी कंपन्यांनी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची तयारी दाखवलीय.. आता मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
22 Dec 2023, 21:02 वाजता
खलिस्तानी दहशतवादी पन्नूची खासदारांना धमकी
Hemant Patil : खलिस्तानी दहशतवादी गुरदीपसिंह पन्नूनं खासदारांना धमकीचा फोन केलाय. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून दोनदा धमकीचा फोन केलाय. या फोनमध्ये त्यानं २६ जानेवारीला भारतात बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी दिलीय. १४ डिसेंबरला रात्री १० वाजता पन्नूनं फोन केला होता. यासंदर्भात खासदार हेमंत पाटील यांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून धमकीबाबत माहिती दिली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
22 Dec 2023, 19:32 वाजता
शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा
Raigad Shinde Camp Vs Thackeray Camp : रायगडच्या महाडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झालाय, छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही गट आमनेसामने आले.. आमदार भरत गोगावले यांच्या निषेधावरुन दोन्ही गटात जुंपलीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल गोगावलेंनी चुकीचं वक्तव्य केलं असा आरोप ठाकरे गटानं केलाय.. त्यावरुन दोन्ही गट भिडले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आलीय मात्र अद्यापही तणावाचं वातावरण आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
22 Dec 2023, 19:18 वाजता
पवार कुटुंबात कुठेही मॅचफिक्सिंग नाही - अजित पवार
Ajit Pawar : पवार कुटुंबात कुठेही मॅचफिक्सिंग नाही असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अजित पवार गटातल्या आमदार आणि पदाधिका-यांच्या बैठकीत केलंय. आपल्यासोबत आलेल्यांना फसवायचं नाही. त्यामुळे घेतलेल्या भूमिकेत बदल नाही आणि ते स्टॅम्पपेपरवर लिहून देतो अशी ग्वाही अजितदादांनी पदाधिका-यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे कशाला वाईटपणा घ्यायचा असं तुम्हाला वाटेल. त्यामुळे त्याचा विचार करून नका असं त्यांनी बैठकीत सांगितल्याचं समजतंय. काहीजण जाणीवपूर्वक कमळावर लढणार असल्याचं पसरवतायत अंसही अजित पवारांनी बैठकीत नमूद केलं. तसंच आता लोकसभा महत्त्वाची आहे. त्यामुळे आताच विधानसभेचा विचार करू नका असंही त्यांनी बजावलंय. बोलताना आणि चर्चा करताना महायुतीतले मित्र पक्ष नाराज होणार नाहीत य़ाची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी आमदार पदाधिका-यांना दिल्या आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
22 Dec 2023, 19:16 वाजता
माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा
Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी कोर्टानं माजी मंत्री सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय... त्याशिवाय साडे बारा लाख रुपये दंड किंवा आणखी एक वर्षांची शिक्षा देखील कोर्टानं दिलीय.. तब्बल 150 कोटी रुपयांच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात 9 आरोपी होते. त्यापैकी 6 जणांना कोर्टानं दोषी ठरवलंय. सरकारी रोखे खरेदीत हा घोटाळा झाला होता.. 2001-02 दरम्यान हा घोटाळा झाला होता. त्यावेळी सुनील केदार बँकेच्या अध्यक्षस्थानी होते. तब्बल 22 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागलाय..सरकारी वकिलांची काय प्रतिक्रिया आहे ते पाहूयात..
बातमीचा व्हिडीओ पाहा
22 Dec 2023, 19:11 वाजता
शनिशिंगणापूर देवस्थानचे कर्मचारी बेमुदत संपावर
Shanishingnapur Temple : शनिशिंगणापूरच्या देवस्थानातील काम करणा-या कर्मचा-यांनी बेमुदत संपाची हाक दिलीय. तब्बल चारशे कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 25 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारलाय. गेल्या काही दिवसांपासून कर्मचा-यांनी विविध मागण्यांसाठी विश्वस्त मंडळाकडे पाठपुरावा केला होता. त्यासाठी आज बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीत तोडगा निघाला नाही. यामुळे कामगार संघटनेने 25 तारखेपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपामुळे नाताळ आणि नववर्षानिमित्त शनिशिंगणापूर येथे होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी विश्वस्त मंडळाची अडचण होऊ शकते मात्र कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर जाण्यावर ठाम आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
22 Dec 2023, 18:58 वाजता
जालन्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द
Jalna Police : मनोज जरांगेंच्या संभाव्य आंदोलनामुळे जालना पोलिसांच्या सुट्टया रद्द करण्यात आल्यायत. पोलीस अधीक्षकांनी हे आदेश दिलेत. मनोज जरांगे पाटलांच्या संभाव्य आंदोलनामुळे जालन्याच्या पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पोलिसांच्या सुट्टया रद्द केल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हे आदेश दिलेत. तसंच जालन्यात अवैध शस्त्रंही जप्त केली जातायत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
22 Dec 2023, 17:53 वाजता
भाजपविरोधात इंडिया आघाडी आक्रमक
India Alliance Against BJP : खासदारांच्या निलंबनाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक झालीय. लोकशाही वाचवायला हवी, असं पवारांनी म्हटलंय. तर संसदेमध्ये घुसखोऱी झाली, तेव्हा भाजपचे खासदार पळून गेले, त्यांची देशभक्ती दिसून आली, अशी टीका राहुल गांधींनी केलीय.खासदार निलंबनाविरोधात दिल्लीत जंतरमंतरवर विरोधकांनी आंदोलन केलं. संसदेतील गोंधळाप्रकरणी आतापर्यंत 146 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय.
22 Dec 2023, 16:27 वाजता
नोटिसा देऊन नवा प्रयोग करु नका-जरांगे
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलकांना पोलिसांनी बजावलेल्या नोटीसांवरून मनोज जरांगेंनी पुन्हा सरकारला इशारा दिलाय. नोटीसा देऊन नव्या प्रयोगाचा प्रयत्न करू नका नाहीतर महाराष्ट्रात फिरणं मुश्कील होईल असा दम जरागेंनी भरलाय. आमची चूक नाही त्यामुळे आम्ही मागं हटणार नाहीत असा निर्धार जरांगेंनी परभणीतल्या सेलुमधील सभेत केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
22 Dec 2023, 15:51 वाजता
पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा पेपर फुटला
Pune Paper Leak : एमबीए प्रथम वर्ष प्रथम सत्रातील लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची परीक्षा होती. मात्र, चिखली येथील डी वाय पाटील येथून प्रश्नपत्रिका फुटल्याची प्राथमिक माहिती आहे. 22 डिसेंबरला एमबीए प्रथम सत्रातील लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार होती. मात्र त्याआधीच या विषयाचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला. सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. विद्यापीठाने हा पेपर रद्द करुन पुन्हा घ्यायचा निर्णय घेतलाय. २६ डिसेंबरला हा पेपर पुन्हा होणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -