Maharashtra Breaking News Today LIVE Updates: भारताची लोकसंख्या कमी होत आहे ही चिंतेची बाब: मोहन भागवत

Maharashtra Breaking News 1st December 2024 LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींबरोबर दिवसभरात घडणाऱ्या प्रमुख बातम्यांचा धावाता आढावा अगदी मोजक्या शब्दांमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: भारताची लोकसंख्या कमी होत आहे ही चिंतेची बाब: मोहन भागवत

1 Dec 2024, 12:42 वाजता

फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन

भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीसांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन केला आहे. फडणवीसांनी  शिंदेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. एकनाथ शिंदे प्रकृती अस्वास्थ्यामुळे दरे गावात विश्रांतीसाठी गेले आहेत. शिंदे आजच ठाण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

1 Dec 2024, 12:05 वाजता

भारताची लोकसंख्या कमी होत आहे ही चिंतेची बाब: सरसंघचालक मोहन भागवत

समाजाकरता कुळाचा त्याग करायचा आणि कुळाकरता एका व्यक्तीचा त्याग करायचा असतो. कुटुंब हा समाजाचा घटक आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये बोलताना केलं आहे. जनसंख्या कमी होते हे चिंतेचा विषय आहे. आपल्या देशाची जनसंख्या वाढ ही 2.1 पेक्षा कमी नको, हे टिकलं पाहिजे. चांगलं वाईट नंतर ठरवू. आपल्या संस्कृतीची जगाला गरज आहे. सगळे सुखी व्हावे याकरता हा धर्म आहे. जातपात भेद करायला नको. शास्त्रात याला स्थान नाही, असंही भागवत म्हणाले. 

1 Dec 2024, 11:58 वाजता

शरद पवारांच्या भेटीसाठी संजय राऊत YB सेंटरमध्ये दाखल

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला यशवंतराव भवन सेंटर येथे दाखल झाले आहेत. पवार आणि राऊत यांच्यात मत फळणीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. या आधी झालेल्या शरद पवार यांच्या पक्षाच्या बैठकीत वकिलांची टीम तयार करण्याचा निर्णय झाला होता. ईव्हीएमवरुन उमेदवारांनी केलेल्या तक्रारींवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.

1 Dec 2024, 11:55 वाजता

जयकुमार रावळ आणि रवी राणा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी 'सागर' बंगल्यावर दाखल झाले आहेत.

1 Dec 2024, 11:07 वाजता

शरद पवारांनी बोलावली पक्षाच्या आमदारांची बैठक

शरद पवारांनी त्यांच्या पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज दुपारी 3 वाजता मुंबईतील पक्ष कार्यालयात बैठक बोलावली आहे. आज होणाऱ्या बैठकीत गटनेता, विधीमंडळ पक्ष नेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड होण्याची शक्यता आहे. गटनेतेपदी जयंत पाटील यांची तर प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाचे प्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे.

1 Dec 2024, 10:09 वाजता

नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली

महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली आहे. नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला 16 ते 21 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. नव्याने निवडून आलेल्या सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन कमी दिवसांचे असणार आहे. विधानसभेत पहिल्यांदाच विरोधीपक्ष नेता नसेल.

1 Dec 2024, 10:09 वाजता

मुख्यमंत्री दुपारी 2 वाजता दरेगावाहून रवाना होणार

मुख्यमंत्री दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दरेगावाहून निघणार आहे. ते दरेगावाहून ठाण्याकडे रवाना होणार आहेत. 

1 Dec 2024, 10:06 वाजता

चकमकीत सात माओवादी ठार

तेलंगणमधील मुलुगु जिल्ह्यातील एतुरुनगरम जंगल परिसरात सुरक्षारक्षकांसोबत झालेल्या चकमकीत सात माओवादी ठार झाले. यासंदर्भातील माहिती मुलुगु जिल्ह्याचे एसपी डॉ. शबरिश यांनी दिली. 

1 Dec 2024, 10:06 वाजता

बारामती : युगेंद्र पवारांनी फेर मत पडताळणीसाठी केला अर्ज

युगेंद्र पवारांनी मत पडताळणीसाठी अर्ज केला आहे. अजित पवार यांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार हे उमेदवार होते. पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी मत पडताळणीसाठी अर्ज केलेला आहे.

1 Dec 2024, 10:03 वाजता

पुण्यातील 11 मतदारसंघांमध्ये EVM फेरतपासणीसाठी अर्ज

विधानसभा निवडणुकीत मतमोजणीत घोळ झाल्याच्या आरोपानंतर पुणे जिल्ह्यातील तब्बल 11 मतदारसंघांतील पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्रांची पडताळणी करण्यासाठी अर्ज केला आहे. या 11 उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8 आणि काँग्रेसच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे. शिरूरमधील अशोक पवार, बारामतीतील युगेंद्र पवार, हडपरसमधील प्रशांत जगताप, चिंचवडमधील राहुल कलाटे, खडकवासलामधील सचिन दोडके, पर्वतीमधील अश्विनी कदम, भोसरीमधील अजित गव्हाणे, तर दौंडमधील रमेश थोरात यांचा समावेश आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंटमधील रमेश बागवे, पुरंदरमधील संजय जगताप आणि भोरमधील संग्राम थोपटे यांनीही अर्ज केला आहे. पडताळणी करण्यासाठी प्रत्येकी 42 हजार 500 रुपये अधिक 18 टक्के जीएसटी आकारून एकूण 47 हजार 200 रुपये आकारले जातात. त्यानुसार या सर्व उमेदवारांनी 64 लाख 66 हजार 400 रुपये जिल्हा निवडणूक शाखेकडे जमा केले आहेत.