Madha Crime: माढामध्ये पत्नीच्या 'लाडक्या बहिण' योजनेच्या पैश्यावर पतीने डल्ला मारल्याची घटना समोर आली होती. लाडक्या बहीण योजनेचे पैसे काढून दारुवर परस्पर खर्च का केले? असा जाब विचारणाऱ्या पत्नीवर पती आणि सासूने कोयत्याने हल्ला केल्याचे वृत्त समोर आले होते. पण आता या कहाणीत मोठा ट्विस्ट आलाय. त्यामुळे ही कहाणी कशी वळण घेते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काय आहे नेमकी ही घटना? या घटनेला कशामुळे वेगळं वळण आलंय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हेच पैसे दारू पिण्यासाठी पतीने मागितले. माढा तालुक्यातील कुर्डूवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला. दारुवर लाडक्या बहिण योजनेचे पैसै का उडवले? अशी विचारणा केल्यावर कोयत्याने हल्ला करुन पती आणि सासूवर कुर्डूवाडी पोलिसांत 326 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.पत्नीने पैसे न दिल्याने त्याने थेट पत्नीच्या हातावर कोयत्याने वार केल्याची तक्रार पत्नी निशा धनाजी लोंढे यांनी कुर्डवाडी पोलीस ठाण्यात दिली होती.
पीडित पत्नी निशा हिने आता आपल्या आरोपावरून घुमजाव केले आहे. आमच्यात घरगुती भांडण झाले होते. त्या रागात वैरण कापत असताना बोटाला दुखापत झाली असे आता निशा पोलिसांना सांगत आहे. दवाखान्यात गेल्यानंतर पोलिसांनी तिला माहिती विचारल्यानंतर तिने हे उत्तर दिले आहे. रागाच्या भरात आपण लाडक्या बहिणीच्या हप्त्याचे पैसे नवऱ्याने घेतले. मला मारहाण झाल्याची फिर्याद मी रागाच्या भरात दिल्याची भूमिका आता पत्नीने घेतली आहे. त्यामुळे आता कायदेशीर फिर्याद महत्वाची? की नंतर लाडक्या बहिणीने घेतलेली भूमिका योग्य? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.