साताऱ्यातील ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दाव्यांमध्ये एक कटू सत्य समोर आले आहे. साताऱ्यातील संगम माहुली येथील मराठा साम्राज्याच्या पराक्रमी महाराणी ताराबाई यांची समाधी आजही उपेक्षित अवस्थेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांच्या निधनानंतर मुघलांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या आणि मराठा साम्राज्याचे नेतृत्व करणाऱ्या ताराबाई यांचे साताऱ्यात निधन झाले. त्यांची समाधी साताऱ्यात आहे, परंतु तिची अवस्था अत्यंत वाईट आहे.ज्या ठिकाणी ही समाधी होती तिचा जिर्णोद्धार करण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एका प्रतिष्ठानच्या वतीने उत्खनन करण्यात आले. मात्र या प्रतिष्ठानकडून देखील या समाधीच्या ठिकाणी काहीच करण्यात आलं नाही. ज्या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं ते ठिकाण अजूनही दुर्लक्षितच असून त्या ठिकाणावरचे जुने दगड अवशेष हे गावातील एका ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिक या समाधीच्या दुर्दशेबाबत नाराज आहेत. महाराणी ताराबाई यांनी मराठ्यांचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी दिलेल्या संघर्षाचा इतिहास मोठा आहे, पण त्यांच्या समाधीची स्थिती पाहता प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते.
साताऱ्यातील अनेक इतिहासप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते महाराणी ताराबाई यांच्या समाधीच्या सुशोभीकरणाची आणि संवर्धनाची मागणी करत आहेत. याबाबत स्थानिक प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी जनतेची मागणी आहे.
- ताराराणी छत्रपती राजारामांच्या पत्नी
- हंबीरराव मोहितेंच्या ताराराणी कन्या
- स्वराज्य संकटात असताना मराठ्यांचं नेतृत्व केलं
- औरंगजेबाच्या आक्रमणाचा नेटानं सामना केला
- 10 डिसेंबर 1761 साली साता-यात निर्वाण
- संगम माहुलीवर ताराराणींची समाधी
"समाधीची स्थाननिश्चिती मराराणी ताराबाईंचे चरित्रकार जयसिंगराव पवार सरांनी 40 वर्षांपूर्वी केली होती. त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं त्यात याचं छायाचित्र छापलं होतं. त्यानंतर ही समाधी दुर्लक्षित झाली होती. कोल्हापुरातील आम्ही शिवप्रेमी त्या ठिकाणी गेलो होतो. 2005 वा आलेल्या महापुरात समाधीवर 10 फूट वाळूचा थर साचला होता. साताऱ्यातील शिवप्रेमींच्या मदतीने आणि श्रमदान करुन आम्ही ती समाधी वाळूच्या वर आणली होती. तिथे 10-12 दगड आणि 2 शिवलिंग होते. आम्ही पवार सरांच्या पुस्तकातील छायाचित्राप्रमाणे ते रचून ठेवले होते. त्यानंतर अनेक वेळा या समाधीचा जिर्णोद्दार व्हावा म्हणून सातत्याने शिवप्रेमींनी प्रयत्न केले आहेत. येथे छत्रपती घराण्यातील अनेकांच्या समाधी आहेत. पण वारंवार प्रयत्न करुनही या समाधींचा जिर्णोद्धार का होत नाही हा माझ्यासारख्या अभ्यासकाल पडलेला प्रश्न आहे," असं इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत म्हणाले आहेत.
साहित्यिक विश्वास पाटील यांनी यावर म्हटलं की, "महाराणी ताराबाईंनी हिंदवी स्वराज्याची जी सेवा केली ती अतुलनीय असल्याने त्यांची समाधी झालीच पाहिजे. येसूबाई, दुर्गाराणी यांच्यासारख्या तेजस्वी स्त्रिया आजच्या मुलींच्या आदर्श आहेत. ज्यावेळी आपल्या मुली ऑलिम्पिकमध्ये जातात तेव्हा त्यांच्यासमोर ताराराणी आणि इतिहासातील मराठी स्त्रियांचे व्यक्तिमत्व, चरित्र ठेवलं तर लिलया ऑलिम्पिक जिंकतील याची खात्री आहे. औरंगजेबाला पाणी पाजणाऱ्या या महान स्त्रियांचा आदर्श आजच्या पिढीपुढे आला पाहिजे. यावर योग्य संशोधन करुन, संकल्प करत सिद्धीस जायला हवा".
साताऱ्याच्या ऐतिहासिक वारशाला न्याय मिळणार का? की प्रशासन याकडे दुर्लक्षच करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.