Maharashtra Agriculture Land : कृषीप्रधान राज्य अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राची कृषी क्षेत्रात झपाट्याने पिछेहाट होत असल्याचं चित्र आहे. गेल्या 5 वर्षांत महाराष्ट्रानं 3.25 लाख हेक्टर शेतीयोग्य जमीन गमावली आहे.देशभरात कमी झालेल्या एकूण शेतीयोग्य जमिनीपैकी निम्म्याहून अधिक जमीन एकट्या महाराष्ट्राची आहे... केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरातून ही धक्कादायक बातमी समोर आलीय.
महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ- 3.7 कोटी हेक्टर इतके आहे. शेती लागवडीखाली जमीन-1.65कोटी हेक्टर इतकी आहे. 1.64 कोटी हेक्टर जमिनीवर यंदा लागवडीखलाी आहे. कापूस-52 लाख हेक्टर तर सोयाबीन-50 लाख हेक्टरवर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी शक्तिपीठ महामार्गाविरोधात रस्त्यावर उतरले असतानाच शेतीचं क्षेत्र घटत असल्याची समोर आलेली माहिती चिंताजनक आहे. रस्ते, रेल्वे मार्ग, औद्योगिकीकरणामुळे शेतीक्षेत्रात घट होत असल्याचं दिसत आहे.
वाढतं शहरीकरण, राष्ट्रीय, राज्य महामार्ग, रेल्वे मार्गांसाठी भूसंपादन, औद्योगिकीकरणासाठी शेतीयोग्य जमिनीचा वापर अशी कृषी क्षेत्र घटण्याची अनेक कारणं आहेत. दरम्यान पायाभूत प्रकल्पांसाठी जमिनी लागणारच आहेत. त्यामुळे शेतीची जमीन कमी होणार असल्याचं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय. राज्यात कमी झालेल्या शेतीवरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारसाठी धोक्याचा इशारा दिलाय.. तसेच देशात एक दिवस अन्नधान्याचा गंभीर प्रश्न उभा राहील असंही त्यांनी म्हटलंय.
देशात झालेल्या हरितक्रांतीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा होता. त्याच राज्यातील शेती आता अडचणीत असल्याचं स्पष्ट होऊ लागल आहे. पायाभूत प्रकल्पांसह औद्योगिकीकरण विकासासाठी महत्त्वाचं असलं तरी त्यासाठी शेतीयोग्य जमीन वापरणं धोकादायकच आहे. सरकारने प्रकल्पांसाठी शेतीयोग्य जमीन देणं टाळायला हवं. अन्यथा येणा-या पिढीला पश्चाताप करण्याशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही.