Maharashtra Assembly Election: शिवसेनेतील शिंदेंच्या बंडाला पहिल्या क्षणापासून साथ देणारे, गुवाहाटीतून बंड गाजविलेले आणि प्रचाराच्या काळात खुद्द शिंदेंनी धोनी ठरवलेले शिवसेनेचे आमदार शहाजीबापू यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेने सांगोल्यातून त्यांना उमेदवारी जाहीर केली होती. मतदारसंघातून शेकापचे बाबासाहेब देशमुख जिंकले आहेत. शहाजीबापूंचा पराभव हा शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
एकनाथ शिंदेंचं समर्थन करताना शहाजीबापू हे संजय राऊतच काय तर उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या बड्या बड्या नेत्यांना जहरी शब्दांत सोलून काढत होते. त्याचवेळी एकनाथ शिंदेंच्या अनेक सभांमध्ये शहाजीबापू जोरदार बॅटिंग करत, सभा जिंकत होते. याच शहाजीबापू पाटलांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत पेटून उठले होते. तरीही, आपण जिंकणार असल्याचं बोलून दाखवत होते. या निवडणुकीतील एका प्रचारसभेत शहाजीबापू हे आमचे धोनी असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदेंनी शहाजीबापूंना सलामीचे आणि ताकदीचे खेळाडू असल्याचे जाहीर केले होते. मात्र, आता शिंदेंचे धोनी चक्क क्लिनबोल्ड झाल्याचे निकालाच्या आकड्यांनी दाखवून दिले आहे.
नवख्या शेकाप उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी 23 हजार मतांनी धूळ चारली आहे. आपला विजय शेकापचे कार्यकर्ते आणि यांना समर्पित असून आबासाहेबांना सांगोल्याच्या जनतेने श्रद्धांजली वाहिली असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिली आहे.