'औरंगजेबाची कबर उखडायची तर उखडून टाका, पण...', उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगून टाकलं, 'मोदींच्या नागपूर दौऱ्याआधी...'

Uddhav Thackeray in Maharashtra Assembly Session: औरंगजेबाची कबर उखडायची तर उखडून टाका. कोणीही शिवप्रेमी औरंजगेबी प्रेमी असू शकत नाही. उखडायचं तर उखडून टाका, पण दुतोंडी भूमिका घेऊ नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला केलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 20, 2025, 05:36 PM IST
'औरंगजेबाची कबर उखडायची तर उखडून टाका, पण...', उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगून टाकलं, 'मोदींच्या नागपूर दौऱ्याआधी...'

Uddhav Thackeray in Maharashtra Assembly Session: औरंगजेबाची कबर उखडायची तर उखडून टाका. कोणीही शिवप्रेमी औरंजगेबी प्रेमी असू शकत नाही. उखडायचं तर उखडून टाका, पण दुतोंडी भूमिका घेऊ नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला केलं आहे. नागपूरमध्ये दंगल घडते आणि दुसरीकडे सत्ताधारी नगरविकास खातं आणि ठाणे पालिकेतील भ्रष्टाचाराची लख्तरं काढत आहेत हादेखील अभ्यास करण्यासारखा योगायोग आहे असंही ते उपहासात्मकपणे म्हणाले आहेत. ते विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. 

"सत्ताधारी ढिगभर आणि विरोधक मूठभर आहेत. मूठभर असलेला विरोधी पक्ष, सत्ताधाऱ्यांना भारी पडत आहे. आज सर्व पक्षाचं एक शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेलं होतं. ज्या पद्धतीने कामकाज रेटलं जात आहे, ते नितीमूल्यांना पायदळी तुडवणारं आहे. राज्यपाल जेव्हा भाषण करतात तेव्हा ते आपलं सरकार म्हणतात, त्यामुळे सरकारची जबाबदारी राज्यपालांचीही आहे. जर ही राज्यपालांची जबाबदारी असेल, तर ते व्यवस्थित होत असताना कान पकडण्याचा अधिकार त्यांना आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

"आम्हाला जी अपेक्षा होती, ती पूर्ण करण्यासाठी सरकारकडे अजून आठवडाभर वेळ आहे. हे सरकार आल्यानंतर आपले प्रश्न सुटतील असं अनेकांना वाटलं होतं. खून, भ्रष्टाचार थांबतील असं वाटत होतं. पण योगायोगाने बऱ्याच वर्षानंतर नागपुरात जातीय दंगल झाली. आरएसएसच्या मुख्यालयाला मोदी भेट देणार आहेत, गडकरींचा गड आणि मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठिकाणी जातीय दंगल झाली. औरंगजेबाचं थडगं संभाजीनगरमध्ये आहे. महाराष्ट्रात कुठेही पडसाद उमटले नाही. पण नागपूरमध्ये घडलं," असंही ते म्हणाले. 

पुढे त्यांनी सांगितलं की, "एका बाजूला अधिवेशन सुरु असताना, पंतप्रधांनांची भेट नियोजित असताना दंगल कोणी घडवली हा संशोधनाचा विषय आहे. नागपूरमध्ये दंगल घडते आणि त्याच अधिवेशनात भाजपा आमदार नगरविकास खातं आणि ठाणे पालिकेतील भ्रष्टाचार च्व्हाट्यावर आणत आहेत. मग ही दंगल नेमकी कोणाची आहे? नागपूरमध्ये दंगल घडते आणि सत्ताधारी नगरविकास खातं आणि ठाणे पालिकेतील भ्रष्टाचाराची लख्तरं काढत आहेत हादेखील अभ्यास करण्यासारखा योगायोग आहे".

"हे सरकार अपयश लपवण्यासाठी एक एक गोष्टी करत आहे. त्यात ते अपयशी ठरत आहे. या सरकारच्या कारभाराचे धिंडवडे दिवसागणिक समोर येत आहेत. वेळ मारुन नेण्यासाठी हा कारभार सुरु आहे. आता तरी  जी दिशाभूल करण्याचा, थडगी काढण्याचा जो प्रयत्न सुरु आहे तो थांबवून, जनतेने खरंच बहुमत दिलं असेल तर ते बहुमत सत्कारणी लावा. कारण संधी परत परत मिळत नाही. संधी मिळाली असेल तर त्याचं सोनं करा, चिखल करु नका," असं आवाहनही त्यांनी सरकारला केलं. 

औरंगजेबच्या कबरीला संरक्षण देण्यासंदर्भात विचारलं असता म्हणाले, "हे संरक्षण कोणी दिलं? उखडायचं तर उखडून टाका. कोणीही शिवप्रेमी औरंजगेबी प्रेमी असू शकत नाही. उखडायचं तर उखडूने टाका, पण दुतोंडी भूमिका घेऊ नका. मी आरएसएसने कान टोचले याबद्दल आभारी आहे. आता ते किती काळ उपयोगी ठरतात हे पाहावं लागेल".

दिशा सालियन प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर होणाऱ्या आरोपांबाबत ते म्हणाले की, "एक दोन अधिवेशनात हा मुद्दा नाही तेव्हा आश्टर्य वाटलं. दरवेळी अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो. शेतकऱ्याच्या चिता पेटत आहेत त्याला जबाबदार कोण आहे. त्यांच्या मुली आमच्या वडिलांची हत्या झाली म्हणत आहेत त्या चौकशीचं काय. संतोष देशमुख यांच्या हत्येचं काय? हा विषय कोर्टात सुरु आहे तिथे काय ते पुरावे द्या".

पुढे ते म्हणाले, "आमचं घराणं, सात पिढ्या जनतेसमोर आहेत. या विषयात काही तथ्य नाही, दुरान्वये संबंध नाही. जर राजकारण वाईट बाजूला न्यायचं असेल तर सगळ्यांची पंचाईत होईल. खोटं नंतर तुमच्यावर बुमरँग होऊ शकतं". 

"जर देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांनी भडकाऊ भाषण करु नये म्हटलं असेल तर मी त्याचं स्वागत करतो. त्यांच्याकडे जे आगलावे घेतले आहेत, विरोधी पक्ष संपवण्यासाठी ज्या विषाचा प्रयोग केला, आज तेच विष आता भाजपाला मारत आहे," असंही ते म्हणाले.