शिवसेना-मनसे युतीला ब्रेक? मराठीजनांचे 'ठाकरे पर्वा'चे स्वप्न अधुरेच; पडद्यामागे नक्की घडतंय काय?

MNS Shiv Sena Alliance: ठाकरे बंधूंची युती लांबणीवर पडण्याची शक्यता. दोन्ही ठाकरेंकडून अद्याप युतीबाबत बोलणी नाहीच, अशी माहिती समोर येत आहे.

ब्युरो | Updated: May 16, 2025, 10:59 AM IST
शिवसेना-मनसे युतीला ब्रेक? मराठीजनांचे 'ठाकरे पर्वा'चे स्वप्न अधुरेच; पडद्यामागे नक्की घडतंय काय?
maharashtra breaking news MNS Shiv Sena Alliance delay ahed of bmc election

MNS Shiv Sena Alliance: गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षात युती होऊ शकते, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र ठाकरे बंधूंची युती लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन्ही ठाकरेंकडून अद्याप युतीबाबत कोणतीही बोलणी झालेली नाही, असंही बोललं जातंय. मात्र आता ही युती लांबणीवर पडली असल्याची चर्चा सुरू आहे. 

ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्रित येऊन महाराष्ट्राला ठाकरे पर्व पाहायला मिळेल, अशी आशा मनसैनिक आणि शिवसैनिकांना होती. मात्र आता ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. राज ठाकरेंनी पुन्हा पुढाकार घ्यावा असं अवाहन त्यांना संजय राऊतांनी केलं होतं. मात्र त्यांच्या अवाहनाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. राज ठाकरेंनी मनसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. तसंच, युतीच्या भरवशावर राहू नका, असंदेखील राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांकडून युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समोर आहे. परदेश दौऱ्यावरुन दोन्हीही नेते परत आले आहेत. मात्र अद्यापही युतीच्या बाबतीत कोणत्याही हालचाली दिसत नाहीयेत. अशातच राज ठाकरेंनी आता कार्यकर्त्यांना युतीबाबतीत आता बोलू नका, अशा सूचना दिल्या आहेत. युतीबाबतचा जो काही निर्णय आहे तो आपणच घेऊ, असे आदेशदेखील राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिल्या आहेत. युतीबाबतच्या चर्चांकडे लक्ष न देता आता कामाला लागा, असे स्पष्ट आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. 

मुंबई आगामी महापालिका निवडणूक महायुती की उद्धवसेना यांच्यासोबत लढवायची की पुन्हा एकदा स्वबळावर लढायचे याचा योग्य वेळी, योग्य निर्णय घेण्यात येईल. मात्र, सध्या युतीबाबत कोणतीही विधाने करू नका, अशा स्पष्ट सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

संजय राऊत काय म्हणाले? 

संजय राऊत यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. ठाकरे बंधूंची युती लांबणीवर पडलेली नाही. र्व व्यवस्थित चालू आहे. योग्यवेळी समजेल. पडद्यामागे पटकथा लिहिली जाते आणि ही पटकथा लिहिली जाईल. या सगळ्याचा बाळंतपण होऊ द्या. आम्ही सकारात्मक आहोत, असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.