'डोळ्यात डोळे घालून बोलणारा विरोधी पक्षनेता सरकारला नको', विरोधी पक्षनेत्याविना संपणार अर्थसंकल्पीय अधिवेशन?

अधिवेशन संपत आलं तरी विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याची निवड केलेली नाही  

शिवराज यादव | Updated: Mar 25, 2025, 10:05 PM IST
'डोळ्यात डोळे घालून बोलणारा विरोधी पक्षनेता सरकारला नको', विरोधी पक्षनेत्याविना संपणार अर्थसंकल्पीय अधिवेशन?

विरोधी पक्षनेत्याविना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार, अशी चिन्ह सध्या दिसत आहेत. कारण अधिवेशन संपत आलं तरी विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याची निवड केलेली नाही. उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांच्या नावाचीही विधानसभा अध्यक्षांकडे शिफारस केली आहे. मात्र राहुल नार्वेकर याबाबत काही हालचाल करताना दिसत नाही आहेत. 

विरोधी पक्षनेत्याविना अर्थसंकल्पीय अधिवेशन

अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्षनेत्याची निवड नाही

निवड होत नसल्यानं भास्कर जाधव निर्वाणीवर

महायुती सरकार दुस-यांदा सत्तेत आल्यानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधकांपैकी कोणत्याच पक्षाकडे संख्याबळ नाही. त्यामुळं विरोधी पक्षनेता कोण निवडायचा हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत. हिवाळी अधिवेशनात त्यांनी विरोधी पक्षनेता निवडला नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेता निवडावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. त्यांनी भास्कर जाधवांच्या नावाचीही विधानसभा अध्यक्षांकडं शिफारस केली. पण अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आलं तरीही विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. सरकारच्या डोळ्यात डोळे घालून बोलणारा विरोधी पक्षनेता सरकारला नको असल्याची टीका भास्कर जाधवांनी केली.

संविधान स्वीकारल्याला 75 वर्ष झाल्याच्या निमित्तानं आयोजित विशेष चर्चेतही त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा उपस्थित केला. किमान विधानसभा उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेतेपदाची निवड करुन घटनेचा सन्मान करावा असं आवाहनही जाधव यांनी केलं.

निर्वाणीवर आलेल्या भास्कर जाधवांनी आपल्या नावाला विरोध असेल तर आपण माघार घेतो पण विरोधी पक्षनेता निवडा अशी विनवणीही सरकारला करुन पाहिली.

अधिवेशन संपता संपता तरी विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतील अशी अपेक्षा विरोधकांना आहे. पण सध्या तरी विधानसभा अध्यक्ष कोणताही निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत नाहीत. त्यामुळं विरोधी पक्षनेत्याची निवड आता पावसाळी अधिवेशनापर्यंत लांबणीवर पडणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे.