मुहूर्त कन्फर्म : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता पीएम मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी

Maharashtra New CM Oath Ceremon : महाराष्ट्र सत्तास्थापनेबद्दल आताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Nov 30, 2024, 07:14 PM IST
मुहूर्त कन्फर्म : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता पीएम मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी title=

Maharashtra New CM Oath Ceremon : महाराष्ट्रातील नव्या सरकार स्थापनेचा मुहूर्त ठरला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून तब्बल 8 दिवस उलटल्यानंतर अखेर महायुतीला मुहूर्त सापडला आहे. डिसेंबर 5 गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीसह अनेक मंत्री शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार. नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? हा प्रश्न महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे. शपथविधी 5 डिसेंबरला होणार हे निश्चित झालं असलं तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे अजून अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या लक्षात आलंय. पण कोणीही जाहीर काहीच बोलायला तयार नाही. सोमवारी किंवा मंगळवारी विधिमंडळ गटनेता निवड होईल असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलंय.

शपथविधीची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर केली आहे. गुरुवारी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावर महाराष्ट्राचा नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. 

आपापल्या जिल्ह्यामध्ये जल्लोष करा!

सर्व आमदारांना येत्या 5 डिसेंबरला महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीला सर्व आमदारांना उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच मुंबईबाहेरील आमदारांनी मुंबईत येण्यासाठी तयार राहावे, अशीही सूचना यावेळी करण्यात आली. तसंच महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यामध्ये जल्लोष करा, असं आवाहनही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आलंय.

मुख्यमंत्री भाजपचाच होणार - मुनगंटीवार

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार, माध्यमं जो चेहरा दाखवतात तोच मुख्यमंत्री होणार असं, भाजप नेते सुधीर मनुगंटीवार यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितलं. दरम्यान महायुतीच्या नव्या सरकारचा फॉर्म्युला ठरलाय. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार, अशी माहिती अजित पवारांनी दिलीय. तर 'दोन पक्षाचे दोन उपमुख्यमंत्री होणार असल्याचं ठरलंय, असंही त्यांनी सांगितलंय. 

भाजपला सर्वाधिक 25 मंत्रिपदं मिळणार?

महायुती सरकारचा मंत्रिपदांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय. शिवसेनेला 9 कॅबिनेट 3 राज्यमंत्रिपदं तर राष्ट्रवादीला 6 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं मिळणार असल्याची खात्रीदायक सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेला नगरविकास खातं मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गृहमंत्रिपद भाजपकडंच राहणार असंही समजतंय.